पत्नीची आत्महत्या, पतीवर गुन्हा दाखल (File Photo)
भंडारा : भंडारा शहरातील कपिल नगर, तकिया वार्ड येथे राहणाऱ्या निधी युवराज गजभिये (वय 32) या महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. पतीच्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या आईने पोलिसांकडे तक्रारीत केला आहे. निधीचे लग्न 31 मे 2020 ला युवराज सुरेंद्र गजभिये (33, रा. कपिल नगर, तकिया वार्ड) याच्यासोबत पारंपरिक पद्धतीने झाले होते.
एप्रिल 2023 मध्ये युवराजच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर, तो निधीला सतत टोचून बोलत असे आणि मानसिक व शारीरिक त्रास देत असे. मार्च 2024 मध्ये निधीने तिच्या भावाला या त्रासाबद्दल सांगितले व माहेरी जाऊन राहिली. काही महिन्यानंतर ती सासरी परत गेली. परंतु तिचा मानसिक छळ सुरूच राहिला. या संदर्भात तिने आई आणि भावाला वारंवार माहिती दिली होती.
28 जून 2024 ला निधीने आपल्या लहान भावाला व्हॉट्सअॅपवर मारहाणीच्या जखमेचे फोटो पाठवले होते. त्यानंतर, 24 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 9.45 वाजता तिने ‘मला कोणी विचारत नाही, मला सतत एकटे केले जाते आणि टॉर्चर केले जाते. उन्हाळ्यात मुलाची परीक्षा संपल्यानंतर मी माहेरी येईन आणि सासरी परत जाणार नाही’, असे सांगितले. मानसिक त्रास सहन न झाल्याने पतीच्या सततच्या छळाला कंटाळून तिने गळफास घेऊन आत्महत्या केली, असा आरोप निधीच्या आईने लावला आहे.
आत्महत्या प्रकरणात होतीये वाढ
राज्यात आत्महत्येचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून आत्महत्येच्या घटना उघडकीस येत असतात. अशातच आता कौटुंबिक कारणातून तरुणाने शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारातच चिंचेच्या झाडाला गळफास घेवून एकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शनिवारी भरदुपारी हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. सोहेल येणीघुरे (२८, रा. पाषाण) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.
लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणाची आत्महत्या
धनकवडी परिसरात लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या २८ वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, त्याने तिघांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सनी रमेश आठवले (वय २८) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत कुंदन बाबुराव आठवले (वय ५२) यांनी सहकारनगर पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानूसार, एका महिलेसह अल्पवयीन मुलगा व एका मुलीवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.