
कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या
सेक्टर २६, कोपरी गाव येथील मेघना ज्वेलर्सच्या शेजारील गाळा आरोपींनी फळविक्रीच्या बहाण्याने भाड्याने घेतला होता. याच गाळ्याचा वापर करून २५ सप्टेंबरच्या रात्री आरोपींनी गॅस कटर आणि इतर साहित्याच्या मदतीने ज्वेलर्सच्या भिंतीला भगदाड पाडले. त्यानंतर दुकानात प्रवेश करून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ७ लाख ७९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या घटनेप्रकरणी दुकानदार मोतीसिंग मोहनसिंग परमार यांच्या तक्रारीवरून एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Katraj Tunnel Robbery: कात्रज बोगद्याजवळ दाम्पत्याला लुटणारे चोरटे अटकेत; पोलिसांची मोठी कारवाई
घरफोडीचे गांभीर्य लक्षात घेऊन एपीएमसी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने तपासाला वेग दिला. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढला. त्यानंतर गुन्हा दाखल झाल्यापासून २४ तासांच्या आत दोघांना अटक करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मकाऊर बुजरूक शेख (वय २५, रा. सेक्टर ५, कोपरखैरणे, मूळ झारखंड) आणि झूमा उर्फ राणी मुजफ्फर अली मीर (वय २९, रा. जुहूगाव, वाशी, मूळ पश्चिम बंगाल) यांचा समावेश आहे.
पोलीस उपायुक्त विजय खरात, सहाय्यक पोलीस आयुक्त आदिनाथ बुधवंत आणि एपीएमसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेलार आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतर आरोपींचा शोध घेण्याबरोबरच चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
Pune Crime: कौटुंबिक वादातून संतापला अन् रेल्वे रुळांवर पोहोचला; दुरांतोवर दगडफेक करताच…