संग्रहित फोटो
पुणे : बायकोशी झालेल्या वादाचा राग मनात धरून धावत्या नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसवर दगडफेक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वर्धा जिल्ह्यातील बोरखेडी रेल्वे स्थानक परिसरात २५ सप्टेंबर रोजी ही घटना घडली. रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी नरेंद्रकुमार सिरसा याला नागपुरातील ऑटोमोटिव्ह चौकातून अटक केली.
नागपूरहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या दुरांतो एक्स्प्रेसवर बोरखेडी रेल्वे स्थानक परिसरातून जात असताना अचानक दगडफेक करण्यात आली. धावत्या ट्रेनवर दगडांचा मारा झाल्याने प्रवाशांमध्ये काही काळ घबराट निर्माण झाली. या घटनेत मोठी जीवितहानी झाली नसली, तरी रेल्वे मालमत्तेचे नुकसान झाल्याची माहिती आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरपीएफने तातडीने तपास सुरू केला. बोरखेडी नगर पंचायत परिसरातील विविध सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. त्यावेळी एक संशयित व्यक्ती रेल्वे रुळांच्या दिशेने जाताना दिसून आली. या फुटेजच्या आधारे तांत्रिक तपास सुरू करण्यात आला. दरम्यान, दगडफेकीनंतर आरोपी नागपूर शहरात पळून आल्याची माहिती आरपीएफला मिळाली. गुप्त माहितीच्या आधारे पथकाने ऑटोमोटिव्ह चौक परिसरात सापळा रचून नरेंद्रकुमार सिरसा याला ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान आरोपीने दगडफेक केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेच्या दिवशी पत्नीशी जोरदार भांडण झाले होते. या कौटुंबिक वादामुळे तो संतापलेला होता. त्यानंतर रागाच्या भरात रेल्वे रुळांच्या दिशेने जाऊन समोरून येणाऱ्या दुरांतो एक्स्प्रेसवर दगडफेक केल्याचे त्याने सांगितल्याची माहिती आहे. नरेंद्रकुमार सिरसा हा मूळचा मध्य प्रदेशातील रहिवासी असून, नागपुरात बांधकाम क्षेत्राशी संबंधित इस्त्री आणि मजुरीची कामे करतो. धावत्या रेल्वेवर दगडफेक केल्याप्रकरणी त्याच्यावर रेल्वे कायद्यानुसार पुढील कारवाई करण्यात येत आहे.






