
नवी मुंबई अँटी करप्शनची धडक कारवाई; रिक्षा परमिट ट्रान्सफरसाठी लाच घेताना RTO एजंट ताब्यात
सावन वैश्य, नवी मुंबई: कडक उन्हात, पावसात दिवसभर रिक्षा चालवून आणि रोजचा १-१ रुपया जमा करून आपल्या कुटुंबाचा गाडा हाकणाऱ्या सामान्य रिक्षाचालकांची आरटीओच्या कामात कशी पिळवणूक केली जाते, याचा विदारक प्रकार समोर आला आहे. नवी मुंबई अँटी करप्शन युनिटने काल धडक कारवाई करत रिक्षाचे परमीट ट्रान्सफर करून देण्यासाठी लोकसेवकाच्या (आरटीओ अधिकारी) नावाने ४,५०० रुपयांची लाच घेणाऱ्या एका खासगी आरटीओ एजंटला रंगेहात ताब्यात घेतले. (Navi Mumbai News)
तक्रारदार रिक्षाचालकाला त्यांच्या रिक्षाचे परमीट ट्रान्सफर करायचे होते. हातावर पोट असलेल्या आणि कष्टाची कमाई करणाऱ्या या रिक्षाचालकाकडून खारघर येथील खासगी आरटीओ एजंट विलास गणपती सनगर (वय ६२ वर्ष, रा. नवीन पनवेल, जि. रायगड) याने संबंधित अधिकाऱ्यांच्या नावाने ४,५०० रुपयांच्या लाचेची मागणी केली.
Disha Salian case: दिशा सालियन मृत्यूचे गूढ उकलणार; मुंबई उच्च न्यायालयाकडून सीबीआय चौकशीची मंजुरी
रिक्षाचालक रोज रक्ताचे पाणी करून, प्रवाशांची ने-आण करून आपल्या कुटुंबासाठी एकेक रुपया जोडतात. परंतु, आरटीओशी संबंधित साध्या परमीट ट्रान्सफर किंवा नूतनीकरणाच्या कामांसाठी असे एजंट आणि दलाल सामान्य रिक्षाचालकांना जाळ्यात ओढून त्यांची मोठी आर्थिक पिळवणूक करतात. हक्काच्या परमीटसाठी अशा प्रकारे लाच द्यावी लागत असल्याने रिक्षाचालकांमध्ये मोठा रोष पाहायला मिळत आहे.
लाचेची मागणी झाल्यानंतर तक्रारदाराने नवी मुंबई अँटी करप्शन युनिटकडे तक्रार नोंदवली. अर्जाची पडताळणी केल्यानंतर पथकाने काल सापळा रचला. तक्रारदाराकडून ४,५०० रुपयांची लाच स्वतः स्वीकारताना एजंट विलास सनगर याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले.
नवी मुंबई अँटी करप्शन युनिटचे पोलीस उपअधीक्षक धर्मराज सोनके आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलीस उपअधीक्षक सोनके यांनी नवी मुंबई युनिटचा पदभार स्वीकारल्यापासून गेल्या वर्षभरात लहान-मोठ्या भ्रष्टाचाराच्या घटनांविरोधात सातत्याने मोहिमा राबवून धडक कारवाया केल्या आहेत. गोरगरीब व कष्टाळू नागरिकांची लूट करणाऱ्या दलालांवर आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांवर सोनके यांच्या पथकाने घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे सर्वसामान्य रिक्षाचालकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
आवाहन: हातावर पोट असणाऱ्या सामान्य नागरिकांनी किंवा रिक्षाचालकांनी कोणत्याही शासकीय कामासाठी दलाल अथवा अधिकाऱ्यांना लाच देऊ नये; लाचेची मागणी झाल्यास तात्काळ अँटी करप्शन युनिटशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अडीच लाख रुपये दे, अन्यथा बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवेन; तरुणीची व्यावसायिकाला धमकी