संग्रहित फोटो
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट एकचे पथक सोमवारी (दि. २९ सप्टेंबर) घरफोडी आणि दुचाकी चोरीच्या अनुषंगाने गस्त घालत होते. भक्ती-शक्ती चौकातील पीएमपीएमएल बसथांब्याजवळ दोन जण संशयास्पदरीत्या आढळले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील बॅग पंचांसमक्ष तपासली. त्यात मोठे स्क्रू ड्रायव्हर, हातोडा, छन्नी आणि करवत असे घरफोडीसाठी वापरण्यात येणारे साहित्य मिळाले. दोघांकडे अधिक चौकशी केली असता काळेवाडी आणि मार्केट यार्ड पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील प्रत्येकी एक घरफोडी तसेच चिखली पोलिस ठाण्यातील एक आणि संत तुकारामनगर पोलिस ठाण्यातील तीन दुचाकी चोरीचे गुन्हे केल्याची त्यांनी कबुली दिली. या सहा गुन्ह्यांतील मुद्देमाल व दुचाकी असा एकूण तीन लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलिस उपायुक्त (गुन्हे) रोहिदास पवार, सहायक आयुक्त डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामेश्वर मोताळे, उपनिरीक्षक कर्मराज गावडे, पोलिस अंमलदार विजय शेळकंदे, मनोज राठोड, अजय डगले, उद्धव खेडकर, संदेश देशमुख, विजय जानराव, तेजस भालचिम यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.






