पेट्रोल पंपावर लाखो रुपयांचा अपहार; फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
म्हसवड : म्हसवड येथील एका पेट्रोल पंपावरील व्यवस्थापक काही दिवसांपूर्वी जमा झालेली लाखो रुपयांची रक्कम घेऊन फरार झाला होता. त्याला म्हसवड पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. रणजित नवनाथ सरगर (रा. दीडवाघवाडी, ता. माण) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, म्हसवड येथील सूर्यवंशी यांच्या मालकीच्या यश पेट्रोल पंपावर रणजित सरगर व्यवस्थापक म्हणून काम करत होता. त्याने दिवसभरामध्ये पेट्रोल पंपावर जमा होणाऱ्या पेट्रोल व डिझेल विक्रीतील पैशातील हिशेबामध्ये अपहार करून चार लाख ११ हजार २७९ रुपयांचा अपहार करून फसवणूक केली आहे. याबाबत मुख्य व्यवस्थापक दुर्गेश शिंदे यांनी म्हसवड पोलिसात फिर्याद दाखल केली होती. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, सरगरला पकडण्यासाठी मुंबई, पुणे, सोलापूर जिल्ह्यामध्ये सहाय्यक पोलीस निरिक्षक अक्षय सोनवणे यांनी पथके रवाना केली होती; परंतु संशयित रणजित हा गुंगारा देऊन वेगवेगळ्या ठिकाणी लपून राहात होता, तसेच मोबाईल क्रमांक बदलून चकवा देत होता. तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि इतर प्राप्त माहितीच्या आधारे रणजित सोलापूर सातारा जिल्ह्याच्या सीमेवर येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे वेशांतर करून सोनवणे यांनी सहकाऱ्यांसमवेत त्याचा पाठलाग करून त्याला अटक केली.
रणजितला न्यायालयात हजर केले होते. चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस हवालदार नीता पळे करत आहेत. या कारवाईत पोलिस कर्मचारी नीता पळे, भास्कर गोडसे, महावीर कोकरे, नवनाथ शिरकुळे, राहुल थोरात, वसीम मुलाणी, सतीश जाधव, अभिजित भादुले, दया माळी आदींनी सहभाग घेतला.
घरफोड्या करणाऱ्या गुन्हेगारांना ठोकल्या बेड्या
लष्कर तसेच कोंढवा भागात बंद घरे फोडणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले आहे. लष्कर पोलिसांनी ही कारवाई केली असून, दोन गुन्हे उघडकीस आणत त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला आहे. दोन गुन्हेगार हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील आहेत. आर्यन अजय माने उर्फ मॉन्टी (वय २१, रा. फुरसुंगी) व विशाल मारूती आचार्य (वय २५, रा. रामटेकडी) व ओमकार सुरेश गोसावी (वय २२, रा. फुरसुंगी) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक गिरीषकुमार दिघावकर, पोलिस निरीक्षक प्रदीप पवार, उपनिरीक्षक राहुल घाडगे, रमेश चौधर व त्यांच्या पथकाने केली आहे.