संग्रहित फोटो
सासवड : हॉटेलमध्ये बिअर पिल्यानंतर बिल देताना ९० रुपये जादा सांगितले म्हणून तेथील हॉटेलमधील एकाला वीट आणि लाथा बुक्यांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एवढ्यावरच न थांबता इथे परत दिसला तर तंगडे तोडून हातात देईल अशी धमकीही दिली आहे. याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये पंचायत समितीच्या माजी सदस्याचा समावेश असून, घटनेनंतर सर्वजण फरार झाले आहेत.
सौरभ सुरेश वाघ (वय ३२. रा. वीर ता. पुरंदर) यांनी याबाबत सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर याप्रकरणी पोलिसांनी दिलीप विलास धुमाळ, अमोल आप्पासो धुमाळ, कमलेश शिवाजी धुमाळ, संदिप दादासो धुमाळ, सत्यजित प्रतापशिंग धुमाळ आणि शंभुराज महादेव धुमाळ. (सर्वजण रा. वीर ता पुरंदर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी अशी माहिती दिली कि, वीर गावच्या हद्दीत समृध्दी विअरबार हॉटेलमध्ये चायनीज किचनमध्ये काम करीत असताना हॉटेलमध्ये येणाऱ्या गिऱ्हाईकांचे बिल घेण्याचे सांगून हॉटेल मालक प्रशांत समगीर काही कामानिमित्त घरी गेले होते. काही वेळाने हॉटेलमध्ये या भागातील पंचायत समितीचे माजी सदस्य दिलीप धुमाळ व अमोल धुमाळ बिअर पिण्यासाठी आले. त्यांनी एकूण तीन किंगफिशर बिअर घेतल्या. बिअर पिवून झाल्यानंतर परत जाताना बिलाची चौकशी केली असता हॉटेल मालकाने सांगितल्यानुसार प्रत्येकी २३० प्रमाणे ३ बिअर चे ६९० रुपये सांगितले.
बिलाचा आकडा ऐकल्यानंतर फिर्यादी सौरभ वाघ याला आरोपींनी एवढे बिल कसे काय झाले ? तुझ्या मालकाला फोन लाव असे सांगितले. हॉटेल मालक प्रशांत समगीर यांना फोन केल्यावर २०० रुपये प्रमाणे ६०० रुपये सांगितले. त्यानंतर पैसे दिल्यावर आरोपी दिलीप धुमाळ यांनी तू इथ कसा काय ?असे म्हणून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच चप्पल उगारली असता हुकवली. त्यानंतर फिर्यादीच्या कानाखाली मारली. त्यावेळी तिथे असलेल्या ग्राहकांनी भांडणे मिटवली. त्यानंतर दोघे घरी निघून गेले. तसेच फिर्यादीही मित्राच्या घरी गेला.
तेवढ्यात पल्सर गाडीवरून आरोपी कमलेश धुमाळ, संदीप धुमाळ तिथे आले. त्यापैकी आरोपी कमलेश याच्या हातात लाकडी काठी होती. गणेश धुमाळ याने समोरील वीट घेवून फिर्यादीला घराबाहेर ओढत तू कोणावर हात उचलला आहे असे म्हणून त्याच्या कपाळावर वीट मारली. तसेच इतर आरोपींनी त्याला खाली पाडून काठीने व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्याचवेळी इतर आरोपी सत्यजित धुमाळ आणि शंभूराज धुमाळ यांनी त्याला चौकात घ्या असे म्हणून उमाजी नाईक चौकात आणले.
चौकात आल्यावर सर्वांसमोर फिर्यादीला दोन पायावर गुडघे टेकवून खाली बसण्यास सांगून पुन्हा मारहाण केली. तसेच अमोल धुमाळ यांनी दिलीप धुमाळ यांची माफी मागायला लावली. तसेच इथून पुढे परत काही बोलला तर जिवंत ठेवणार नाही अशी धमकी देवून हॉटेल कसा चालवतो तेच बघतो असे सांगून निघून गेले. पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार व्ही एल जाधव पुढील तपास करीत आहेत.
पुरंदर तालुक्यात गुन्हेगारी वाढली
बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची गाव गुंडांनी अत्यंत निर्घृणपणे हत्या केली होती. जवळपास त्याच पद्धतीचा वापर करून वीर मधील गाव गुंडांनी फिर्यादी सौरभ वाघ याला अगोदर घरी मारहाण केली. त्यानंतर त्याची धिंड काढीत चौकात आणले. तिथे येताच चौकात गुडघ्यावर बसवून सर्वांनी मारहाण केली. एकूणच हा प्रकार अत्यंत गंभीर असून फिर्यादी थोडक्यात बचावला आहे अन्यथा मसाजोगची पुनरावृत्ती झाली असती. एकूणच तालुक्यात मारामारीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून गुन्हेगारी फोफावते असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गुन्हेगारांना तातडीने अटक करून कारवाई होणे आवश्यक आहे. अशी मागणी वाघ यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.