संग्रहित फोटो
पुणे : महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान मतदान केंद्रात गोंधळ घालून निवडणूक प्रक्रिया व शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार रूपाली ठोंबरे यांच्यासह त्यांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १६ जानेवारीला दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास टिळक रस्त्यावरील डी.ई.एस. न्यू इंग्लिश स्कूल येथे घडली होती.
याप्रकरणी कसबा-विश्रामबाग वाडा क्षेत्रीय कार्यालयातील उपअभियंता सुधीर पांडुरंग आलुरकर (वय ५२, रा. पिंपळे गुरव) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. यानुसार ठोंबरे यांच्यासह अन्य काही उमेदवार व समर्थकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, मतमोजणी सुरू असताना ठोंबरे यांनी त्यांच्या हरकत अर्जाची पोहोच द्यावी, अशी मागणी करत मतदान मोजणी केंद्रात उभारलेल्या सुरक्षा जाळीवर चढून आरडा-ओरड केला. त्यांच्या सोबत असलेल्या इतर उमेदवार व प्रतिनिधींनी देखील मोठा गोंधळ घालत निवडणूक प्रक्रियेत अडथळा निर्माण केला. सुरक्षिततेच्या दृष्टीने उभारलेल्या व्यवस्थेचा भंग करून मतमोजणी कामकाजात जाणीवपूर्वक व्यत्यय आणल्याने परिस्थिती काही काळ तणावपूर्ण झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली होती. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
हे सुद्धा वाचा : गुपचूप सुरु होता बालविवाह; पोलिसांना माहिती मिळताच टाकली धाड, अन् नंतर…
रुपाली ठोंबरेंचा ट्रॉलर्सला थेट इशारा
पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्व पक्षांना मागे टाकत भाजपने स्पष्ट वर्चस्व प्रस्थापित केले आहे. शहरातील मुख्य लढत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात होती. या लढतीत भाजपने 119 जागांवर विजय मिळवत महापालिकेवर एकहाती सत्ता मिळवली आहे. या पराभवात अजित पवार गटातील अनेक प्रमुख नेत्यांना धक्का बसला आहे. राष्ट्रवादीच्या माजी प्रवक्त्या रूपाली पाटील ठोंबरे यांचाही पराभव झाला आहे. निकालानंतर रूपाली पाटील ठोंबरे यांच्यावर समाजमाध्यमांवर तीव्र टीका सुरू असून, या टीकेविरोधात त्यांनी थेट कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. आपल्याला संविधानाने मिळालेल्या स्वातंत्र्याचा दुसऱ्यासाठी गैरवापर करून बदनामी, अश्लील कमेंट करू नये. अन्यथा नाहक आपल्यावर कायदेशीर कडक कारवाई करावी लागेल व गुन्हा सुद्धा दाखल करावा लागेल. त्यामुळे माझी विनंती आहे फेक नेरेटिव पसरवणाऱ्या ट्रॉलर्सला माझ्या बाबतीत कोणतीच चुकीच्या बदनामीच्या पोस्ट करू नये. जाणीवपूर्वक गैरसमज करणाऱ्या पोस्ट करू नये”, असा कडक इशारा रुपाली पाटील ठोंबरे यांनी दिला आहे.






