संग्रहित फोटो
पुणे : गुंड निलेश घायवळच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. निलेश घायवळवर गेल्या काही दिवसात अनेक गुन्हे दाखल केले आहेत. त्याला परदेशातून परत आणण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरु आहेत. पुण्यातील कुख्यात गुंडगिरी प्रकरणांमध्ये नाव आल्यानंतर घायवळचा पासपोर्टही रद्द करण्यात आला आहे. अशातच आता पोलिसांनी घायवळला आणखी एक मोठा दणका दिला आहे. घायवळने उसात लपवून ठेवलेली आलिशान कार पोलिसांनी जप्त केली आहे.
निलेश घायवळ याने उसात कार लपवून ठेवला होती. याची माहिती पोलिसांना लागताच ती कार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. घायवळने ही आलिशान कार अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील खर्डा गावातील उसाच्या शेतात लपवून ठेवली होती. ८०५५ नंबर असलेल्या या गाडीला “BOSS” अशी नंबर प्लेट लावलेली होती.
घायवळच्या अडचणी वाढल्या
मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेला गुंड निलेश घायवळ सध्या स्वित्झर्लंडला आहे. त्याने घायवळ ऐवजी गायवळ नावाचा वापर करत पासपोर्ट मिळवण्याचे यापूर्वीच पोलिस तपासात समोर आले. त्यानंतर निलेश घायवळचा पासपोर्ट रद्द करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले होते. निलेश घायवळचा पासपोर्ट अखेर रद्द करण्यात आला आहे. पासपोर्ट प्रदेश कार्यालयातून याबाबतची ऑर्डर जारी झाली आहे. पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी न्यायालयात तसेच पासपोर्ट प्रादेशिक कार्यालयात घायवळ बाबत अहवाल सादर केला होता. पासपोर्ट रद्द झाल्याने निलेश घायवळच्या अडचणी वाढल्या आहेत. निलेश घायवळचे नाव पुण्यातील व अन्य जिल्ह्यातील, गंभीर गुन्हे खंडणी व वर्चस्वासाठी सुरु असलेल्या गुन्हेगारी व्यवहारात वारंवार पुढे आले आहे. पुण्यासह ठिकठिकाणी त्याची टोळी सक्रिय होती.
10 बँक खाती गोठवली
निलेश घायवळ याच्यासह त्याच्या कुटुंबीयांची 10 बँक खाती काही दिवसांपूर्वी गोठवण्यात आली आहेत. बँक खात्यात 38 लाख 26 हजार रुपये असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. पुणे पोलिसांनी विविध बँक प्रशासनासोबत पारव्यवहार केला होता. त्या अनुषंगाने गुंड निलेश घायवळ आणि त्याच्या कुटुंबीयांतील 10 जणांची बँक खाती असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी दिलेल्या पत्रानुसार संबंधित बँक प्रशासनाने निलेश घायवळ, शुभांगी घायवळ, स्वाती निलेश घायकळ, कुसुम घायवळ, पृथ्वीराज एंटरप्रायझेस ही बँक खाती गोठवली आहेत. 10 बँक खात्यांतील 38 लाख 26 हजार रुपये फ्रीज करण्यात आले आहेत. त्यामुळे पुणे पोलिसांच्या एनओसीशिवाय आता संबंधितांना खात्यातील रक्कम काढता येणार नसून, कोणत्याही बँकेचा आर्थिक व्यवहार करता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.






