मावशीच्या घरात चोरी करणाऱ्या भाच्याला ठोकल्या बेड्या; तीन तासात लावला गुन्ह्याचा छडा
पुणे : मावशीच्याच घरात चोरी करणाऱ्या भाच्याला पोलिसांनी अवघ्या तीन तासांत बेड्या ठोकल्या आहेत. त्याने सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख २२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता. पोलिसांच्या तत्परतेमुळे चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
किरण राजेश कुंटे (वय २८, रा. धोबी घाट, कॅम्प) असे पकडलेल्या भाच्याचे नाव आहे. याप्रकरणी ४० वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यावरून लष्कर पोलिसांनी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर आणि निरीक्षक (गुन्हे) प्रदिप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राहुल घाडगे, अंमलदार महेश कदम, सोमनाथ बनसोडे यांनी कारवाई केली आहे.
तक्रारदार या घरकाम करतात. त्या कॅम्प परिसरात राहण्यास आहेत. त्यांच्या मुलीच्या घरी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी घराचा दरवाजा ओढून ठेवला होता. ही संधी साधत अज्ञाताने घरात प्रवेश करून लोखंडी कपाटातून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली. चोरीची ही घटना उघडकीस आल्यानंतर त्यांनी लष्कर पोलिसांत तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून अज्ञातावर गुन्हा दाखल केला होता.
गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांना खबऱ्याकडून माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी किरण कुंटे याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच तो, तक्रारदार यांचाच भाचा असल्याचे समोर आले होते. “तो मावशीच्या (तक्रारदार) घरी पाणी पिण्याच्या बहाण्याने गेला होता. त्यावेळी त्याला मावशीचे घराचे दरवाजे उघडे असल्याचे दिसले. नंतर त्याने चोरीच्या उद्देशाने घरात प्रवेश केला आणि लोखंडी कपाटातील ड्रॉवरमधून सोन्याचे दागिने आणि १० हजार रुपये रोख चोरले. पोलिसांनी किरणकडून चोरीचा सर्व मुद्देमाल, म्हणजेच सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम, जप्त केली आहे. विशेष म्हणजे, ही कारवाई गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या तीन तासांत पूर्ण झाली.