साताऱ्यात पोलिसांनी तस्कराला केली अटक; गांजा विकायला दुचाकीवर आला अन्...
सातारा : सातारा शहर परिसरामध्ये बेकायदेशीररित्या १० किलो ६२० ग्रॅम गांजा बेकायदेशीररित्या घेऊन जाणाऱ्या एका युवकाला स्थानिक गुन्हे शाखेने त्याच्या दुचाकीसह ताब्यात घेतले आहे. त्याच्या ताब्यातील २ लाख ६५ हजार ५०० रुपये किमतीचा गांजा व दुचाकी असा ३ लाख ३५००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बुधवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती प्राप्त झाली की, सातारा शहरात एक इसम मोपेडवरून गांजा घेऊन जाणार आहे. पोलिसांनी या युवकाचा शोध घेऊन सातारा शहरात त्याला अटक केली. अतुल धनाजी भगत (वय २७, राहणार परिमल रेसिडेन्सी, पहिला मजला, गणेश चौक कोडोली) असे संबंध युवकाचे नाव आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक समाधान बिले अधिक तपास करत आहेत.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, शैलेश फडतरे, लक्ष्मण जगधने, प्रवीण फडतरे, अरुण पाटील, गणेश कापरे, अविनाश चव्हाण, अमित माने अमित सपकाळ, स्वप्नील कुंभार, मोहन पवार, ओंकार यादव, विशाल पवार, रवी वर्णेकर, पृथ्वीराज जाधव, सचिन ससाणे, विक्रम पिसाळ, शिवाजी गुरव, अमृत कर्पे, विजय निकम, फॉरेनसिक विभागाचे मोहन नाचन, अमोल निकम, सातारा शहर पोलिस ठाण्याचे पोलीस अंमलदार विक्रम माने, सुहास कदम यांनी सहभाग घेतला होता.
गाडीच्या डिकीत आढळळा माल
स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे, पोलिस उपनिरीक्षक परितोष दातीर यांच्या पथकाने भगत याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली तर त्याच्या गाडीच्या डिकीतून साडेदहा किलो गांजा आढळून आला. हा गांजा त्याला कुठून प्राप्त झाला याविषयी अधिक चौकशी सुरू आहे. या कारवाईत साडेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणाऱ्या अधिनियमाअंतर्गत ८ क व २० ब प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.