खळबळजनक! रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या तरुणीवर पोलिसाचा अत्याचार
कोल्हापूर : राज्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून अत्याचाराच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता कोल्हापूर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कोल्हापूरात एका खासगी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल असलेल्या १५ वर्षाच्या मुलीचा जबाब घेण्यासाठी गेलेल्या पोलीस चेतन दिलीप घाटगेने तिची छेड काढल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पोलिस विभागात खळबळ उडाली आहे.
पीडित मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने तिला शहरातील एका खासगी रुग्णालयात आयसीयू विभागात दाखल करण्यात आले होते. तिचा जबाब घेण्यासाठी बुधवारी रात्री साडेआठ ते नऊच्या सुमारास घाटगे रुग्णालयात गेला होता. यावेळी चेतन याने आपला मोबाईल नंबर तिला देऊन तू माझी मैत्रीण आहेस, असे म्हणत तिच्या पाठीवरून, छातीवरून हात फिरवून, तू भिऊ नकोस, काही अडचण असल्यास मला फोन कर, असे सांगून लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केल्याची तक्रार करण्यात आली आहे.
दरम्यान त्यानुसार पोलिसांनी प्राथमिक चौकशी करून गुरुवारी रात्री ११ वाजता गुन्हा दाखल केला आहे. घाटगे ज्या पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत, त्याच ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चेतन घाटगेला जिल्हा पोलीस प्रमुख यांनी निलंबित केले आहे. पोलिस निरीक्षक क्रांती पाटील यांनी हा गुन्हा दाखल केला आहे.