5 हजाराची लाच घेणं भोवलं; पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात
पुणे : वीज चोरीच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी तसेच अटक न करण्यासाठी कोंढवा पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्याला ५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. तर, या लाचेला प्रोत्साहन देणाऱ्या सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षकावरही गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिस ठाण्याच्या गेटसमोरच सापळा कारवाईचा थरार घडल्याने शहर पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
सोमनाथ बापू महारनवर (वय ३४) असे पकडण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. न्यायालयाने सोमनाथ यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी सेवानिवृत्त पोलिस युवराज कृष्णा फरांदे (वय ५९) यांच्यावर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.
एसीबीच्या माहितीनुसार, ४४ वर्षीय तक्रारदार यांच्याविरूद्ध कोंढवा पोलिसांत वीज चोरीचा गुन्हा नोंद आहे. या गुन्ह्याचा तपास हे सोनमाथ महारनवर यांच्याकडे होता. या गुन्ह्यात मदत करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे १० हजार रूपयांची लाचेची मागणी केली. नंतर तक्रारदारांनी याबाबत एसीबीकडे केली होती. एसीबीने तक्रारीची पडताळणी केली. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. पडताळणीत तक्रारदार यांच्या घरमालकाकडून सोमनाथ याने ५ हजार रुपयांची लाच स्विकारली होती. पण, त्याची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली होती. त्यामुळे तक्रारदार यांना सोमनाथ याने आणखी ५ हजार लाचेची रक्कम संबंधित घरमालकाला देण्यास सांगितले. त्यानूसार, मंगळवारी सायंकाळी सापळा कारवाईत तक्रारदार यांच्याकडून घरमालकाला लाचेची रक्कम देत असताना रंगेहात पकडले. चौकशीत सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षकाने लाच मागण्यास फोनवरून प्रोत्साहित केल्याचे समोर आल्यानंतर त्यांच्यावरही गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
20 हजारांची लाच घेणं भोवलं
गेल्या काही दिवसाखाली दाखल गुन्ह्यात तपासात मदत करण्यासाठी तक्रारदारांकडून तडजोडीअंती २० हजार रुपयांची लाच घेताना लोणावळा शहर पोलिस ठाण्यात सहाय्यक उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. शकील मोहम्मद शेख (वय ४५, रा. लोणावळा) असे पकडलेल्या सहाय्यक उपनिरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी लोणावळा शहर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन १९८८ चे कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.