वारीला निघालेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार, वारकऱ्यांनाही अडवून गळ्याला कोयता (फोटो सौजन्य-X)
महाराष्ट्रात एक अतिशय क्रूर आणि लज्जास्पद घटना घडली. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. महाराष्ट्रातून या घटनेचा संताप व्यक्त होत आहे. एवढेच नाही तर काही वारकऱ्यांना अडवून लुटल्याचा प्रकारही समोर आला आहे.
सध्या राज्यात वारक्यांची पावले लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी पुढे पुढे सरकत आहे. अशातच वारीत जाणाऱ्या एका मुलीसोबत गैरकृत्य घडल्याने महाराष्ट्रात खळबळ निर्माण झाली आहे. ही घटना दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूरकडे जाणारे दोन वारकरी वाटेच चहासाठी थांबले होते. त्यावेळी त्यांच्या जवळ दुचाकीवरून दोन जण आले आणि थांबले.धाकदडपशाही करुन त्यांनी वारकऱ्यांच्या गळ्याला कोयता लावला, यानंतर संशयित लुटारुंनी दोन वारकऱ्यांना लुबाडले. यानंतर ते पुढे निघाले. त्यानंतर त्यांनी एका अल्पवयीन मुलीला गाठले. या मुलीला त्यांनी काही अंतर दूर नेत एका ठिकाणी तिच्यावर अत्याचार केला. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त होत असून, दौंड परिसरात खळबळ उडाली आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणात वारकरी पंढरपूरकडे जातात, त्यामुळे लूटमार आणि गैरकृत्यांच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वारकऱ्यांच्या काय वस्तू आणि पैसे लुबाडले याचा तपशिल तूर्त मिळू शकलेला नाही.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात चालत असलेल्या काही भाविकांना तुम्हाला देवाच्या टोकन दर्शनाचे पास 100 रुपयात देतो, असे सांगून सासवड परिसरात जुन्या पासावर हे नवीन डुप्लिकेट पास बनवून दिल्याचा प्रकार उघडकीस आला. भाविक विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी पोहोचले, तेव्हा प्रवेशद्वारावर स्कॅनिंग करताना ते पास बोगस असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मंदिर प्रशासनाने तात्काळ कारवाई करत या सात भाविकांना बाजूला घेऊन चौकशी सुरू केली होती. भाविकांना हे पास कोणी तयार करून दिले? याबाबत माहिती सांगता आली नाही आली नव्हती. या घटनेमुळे पंढरपुरात एकच खळबळ उडाली होती.
मधुकर तुकारामजी शेंडे (५६, राजाबक्षा, नागपूर) व तुषार रामेश्वर बावनकुळे (२२) दोघेही निस्सीम विठ्ठलभक्त होते. शेंडे हे नेहमीप्रमाणे यंदादेखील ते उत्साहाने वारीत सहभागी झाले. बरडजवळ पालखीचा मुक्काम होता. शेंडे व बावनकुळे इतर वारकऱ्यांसह तंबूत विश्रांतीसाठी थांबले होते. कपडे वाळत टाकण्यासाठी दोरी बांधत असताना बाजूलाच असलेल्या विजेच्या खांबातून त्यांना जोरात शॉक लागला. दोघेही बेशुद्ध पडले. या घटनेमुळे त्यांच्या सहकारी वारकऱ्यांमध्ये शोककळा पसरली होती. शेंडे हे अविवाहित होते व त्यांनी संपूर्ण जीवन वारकरी सेवा व समाजसेवेला अर्पण केले होते. ते बावणे कुणबी समाज केंद्रीय संस्थेचे सक्रिय सदस्य होते. विविध सामाजिक संघटनांशी ते जुळले होते.