संग्रहित फोटो
पुणे : खरेदीच्या बहाण्याने सराफी दुकानात आलेल्या महिलांनी कामगारांची नजर चुकवून तब्बल ५ लाख २२ हजार रुपयांच्या सोन्याच्या बांगड्या चोरून पोबारा केल्याचा प्रकार समोर आला आहे. कोंढवा भागात ही घटना घडली आहे. याप्रकरणी ३६ वर्षीय सराफी दुकान मालकाने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, कोंढव्यात प्रसिद्ध सराफी पेढीचे दालन आहे. दुकानात २२ जून रोजी दोन महिला खरेदीच्या बहाणा करून आल्या. त्यांनी बुरखा परिधान केला होता. त्यांनी कर्मचाऱ्याला सोन्याच्या बांगड्या दाखविण्यास सांगितले. त्यानंतर कर्मचाऱ्याने त्यांना बांगड्या दाखविल्या. प्लास्टिक ट्रेमधील बांगड्या पाहण्याचा बहाणा महिलांनी केला. त्यानंतर कर्मचाऱ्याला बोलण्यात गुंतविले.
कर्मचाऱ्याचे लक्ष नसल्याची संधी साधून महिलांनी ५ लाख २२ हजार रुपयांच्या सोन्याच्या चार बांगड्या लांबविल्या. बांगड्या चोरीला गेल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी सराफी पेढीतील सीसीटीव्ही तपासले असून, त्याआधारे या महिलांचा शोध घेतला जात आहे. अधिक तपास सहायक निरीक्षक थोरात करत आहेत. सराफी पेढीत खरेदीच्या बहाण्याने दागिने लांबविण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत.
हे सुद्धा वाचा : पुण्यात कोयते उगारून टोळक्याची दहशत; घराच्या दरवाज्याजवळ गेले अन्…
महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली
खराडी परिसरातील न्याती मॉलसमोर दुचाकीस्वार महिलेच्या गळ्यातील ६० हजार रुपयांची सोनसाखळी दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी रात्री साडे आकराच्या सुमारास हा चोरीचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी ३० वर्षीय महिलेने खराडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार महिला व तिची मैत्रीण दुचाकीवरुन गुरुवारी (२७ जून) रात्री साडेअकराच्या सुमारास खराडी परिसरातून निघाल्या होत्या. न्याती मॉलसमोर त्या आल्यानंतर दुचाकीवर पाठिमागून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्याजवळ येत गळ्यातील ६० हजारांची सोनसाखळी हिसकावून नेली. महिलेने आरडाओरडा केला. परंतु, चोरटे भरधाव वेगात पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक कोळपे अधिक तपास करत आहेत.