इराणी झेंडे आणि खामेनेईंचे फ्लेक्स; पुण्यात खळबळ, पोलीस अलर्टवर
Pune News: गेल्या काही दिवसांपासून इस्त्राईल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य स्थितीमुळे संपूर्ण जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे राज्यात असो वा देशात ज्या घटना घडतात त्याचे पडसाद महाराष्ट्रावरही पडल्याचे आपण पाहिले आहे. पण आता आंतरराष्ट्रीय स्तरावर घडणाऱ्या घटनांचेही पडसाद महाराष्ट्रात पडल्याचे पाहायला मिळत आहे. पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील काही भागांत इराणचे झेंडे आणि तेथील राष्ट्राध्यक्ष अली खामेनी यांचे पोस्टर झळकताना दिसल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
अलीकडेच इस्त्राईल आणि इराण यांच्यात तणावपूर्ण संबंधांमुळे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. दोन्ही देशांनी परस्परांवर हल्ले करत आक्रमक भूमिका घेतली होती. याच पार्श्वभूमीवर अनेक मुस्लिम राष्ट्रांमध्ये अली खामेनींच्या समर्थनार्थ आंदोलनं, रॅली आणि घोषणाबाजी होताना दिसत आहे.
Telangana Blast: मोठी बातमी! तेलंगणामध्ये फार्मा कंपनीत भीषण स्फोट, 2 ठार तर 14 जखमी
पुण्यातही काही भागांत इराणच्या झेंड्यांची आणि खामेनेईंच्या प्रतिमा झळकावण्यात आल्याने, स्थानिक प्रशासन आणि पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. पोलिसांकडून या प्रकाराची तपासणी सुरू असून, संबंधित पोस्टर कुणी, कशासाठी आणि कोणत्या उद्देशाने लावले, याचा शोध घेतला जात आहे.
या घटनेमुळे पुण्यात सामाजिक तणाव निर्माण होऊ नये यासाठी पोलीस सतर्कतेत वाढ करण्यात आली आहे. प्रशासनाकडून नागरिकांना शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील लोणी स्टेशन परिसरात रविवारी दुपारी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इराणचा राष्ट्रीय ध्वज आणि त्या देशाचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांचे फ्लेक्स सार्वजनिक ठिकाणी लावल्याचे निदर्शनास आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकारामुळे लोणी काळभोर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तात्काळ कठोर कारवाईची मागणी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून परिसरात काही इराणी नागरिकांकडून घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे या प्रकाराकडे दुर्लक्ष केल्यास सामाजिक सलोख्याला धोका पोहोचू शकतो, अशी तक्रार स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
या संपूर्ण प्रकरणाची लोणी काळभोर पोलिसांकडून चौकशी सुरू असून, फ्लेक्स कुणी लावले, त्यामागचा उद्देश काय, याचा तपास सुरू आहे. दरम्यान, पोलीस प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. सामाजिक माध्यमांवरही कोणतीही चिथावणीखोर पोस्ट न टाकण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. या घटनेने आंतरराष्ट्रीय राजकारणाचा स्थानिक पातळीवरील अप्रत्यक्ष प्रभाव अधोरेखित केला असून, पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांसाठीही ही एक महत्त्वाची धोक्याची घंटा ठरत आहे.
Thackeray Brothers Rally: हिंदी भाषा सक्तीकरणावर राज्य सरकारची माघार…; तरीही ठाकरे बंधु एकत्र येणार!
पुणे-सोलापूर महामार्गावरील लोणी स्टेशन (ता. हवेली) परिसरात रविवारी इराणचा राष्ट्रीय ध्वज व अली खामेनी यांचे फ्लेक्स लावल्याची घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ माजली. या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजेश खांडे, उपनिरीक्षक अनिल जाधव, तसेच पोलीस हवालदार रामहरी वणवे, रवी आहेर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
विषय संवेदनशील असल्याने पोलिसांनी संयम राखत इराणी समाजाशी संवाद साधत समजूत काढली. त्यांना “परवानगीशिवाय अशा प्रकारचे फ्लेक्स लावू नयेत, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल,” असा सक्त इशारा दिला. या वेळी इराणी समाजाने पोलिसांपुढे नमते घेत परवानगीशिवाय फ्लेक्स न लावण्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या मदतीने सर्व फ्लेक्स हटवण्यात आले.
पोलीस प्रशासनाकडून सामाजिक सलोखा राखण्याचं आवाहन करण्यात आलं असून, अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कायमस्वरूपी दक्षता घेण्यात येणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. या संपूर्ण प्रकारामुळे स्थानिक पातळीवर सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, यापुढे परवानगीशिवाय कोणतेही पोस्टर किंवा झेंडे लावण्यास मज्जाव करण्यात आला आहे.