मंचरमध्ये भीषण अपघात (फोटो- सोशल मीडिया)
मंचरजवळील एकलहरे रात्री झाला भीषण अपघात
एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू
अपघातात दोन मुले गंभीर जखमी
मंचर: पुणे-नाशिक महामार्गावर मंचरजवळील एकलहरे (ता.आंबेगाव) येथे रविवारी (दि.२२) रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील पती, पत्नी आणि सासू अशा तिघांचा जागीच मृत्यू झाला असून दोन मुले गंभीर जखमी झाली आहेत.
मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मल्लिकार्जुन शिवराज आंबेगावे (रा. पिंपरी, पुणे) हे आपल्या कुटुंबासह नाशिकहून पुण्याकडे कार (एमएच १४ डीटी १७७०) ने येत होते.दरम्यान एकलहरे गावाजवळ कारचा ताबा सुटल्याने ती डिव्हायडर तोडून समोरून येणाऱ्या बसला (एमएच १८ बीझेड ४०६७) धडकली. या भीषण धडकेत चालक मल्लिकार्जुन आंबेगावे (वय ४२), त्यांची पत्नी आरती मल्लिकार्जुन आंबेगावे (वय ४०) आणि सासू लता तूपलोंढे (वय ६०) यांचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगा प्रेम मल्लिकार्जुन आंबेगावे (वय २०) आणि मुलगी मृणाल मल्लिकार्जुन आंबेगावे (वय १६) ही दोन्ही मुले जखमी झाली असून त्यांच्यावर मंचर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला असून दोन्ही टायर फुटल्याचेही समोर आले आहे.
बसच्या पुढील बाजूच्या भागाचे नुकसान झाले आहे. अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी मागून आलेल्या वाहनाने हूल दिल्याने किंवा टायर फुटल्याने वाहनावरील नियंत्रण सुटल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, मंचर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. या अपघाताला कारणीभूत तसेच स्वत:च्या आणि इतरांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या कारणावरून कारचालक मल्लिकार्जुन आंबेगावे यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढले; मग रिसॉर्टमध्ये लग्न केलं अन्…; लोणावळ्यातील धक्कादायक प्रकार
याबाबत बस चालक राजू चत्रू राठोड (वय ३८ रा. उजळत ता.शहादा जि.नंदुरबार) यांनी मंचर पोलिस ठाण्यात फिर्यादी दिली. या घटनेचा पुढील तपास मंचर पोलीसांकडून सुरू आहे. मृतदेहांचे शवविच्छेदन करून ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.
म़त मल्लिकार्जुन आंबेगावे यशस्वी वास्तुअभियंता
मंचरजवळ झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झालेल्या मल्लिकार्जुन आंबेगावे हे नावाजलेले वास्तु अभियंता होते. त्यांनी पीसीएमसी परिसरातील शिव असोसिएट्स या कंपनीत काम करत आपली कारकीर्द घडवली होती. सुरुवातीला त्यांनी सिव्हिल क्षेत्रात काम करताना पुण्यात नोकरी केली आणि त्याचबरोबर बीई (करस्पाँडन्स) शिक्षण पूर्ण केले.
Kerala Crime: अंगावर काटा आणणारी घटना! एकाच घरातील 5 जणांचा मृतदेह, दोन महिला फासावर; केरळमध्ये थरार
त्यानंतर स्वतःची फर्म स्थापन करून त्यांनी स्वतंत्रपणे काम करण्यास सुरुवात केली. पीएमआरडीए अंतर्गत त्यांनी ६० हून अधिक इमारतींचे वास्तुरचना काम यशस्वीपणे पूर्ण केले होते. त्यांच्या मेहनतीमुळे आणि गुणवत्तेमुळे ते क्षेत्रात अत्यंत यशस्वी ठरले होते. सुमारे दहा वर्षांपूर्वी त्यांना मूत्रपिंडाचा गंभीर आजार झाला होता. त्यावेळी त्यांच्या पत्नीने त्यांना किडनी दान केली होती.






