खळबळजनक! शाळेतील विद्यार्थीनीचे फूस लावून अपहरण, आता पोलिसांनी थेट...
उरुळी कांचन : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली. दहावी इयत्तेत शिकत असलेल्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीला फूस लावून पळवून नेल्याची घटना सोमवार (२७ जानेवारी) रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास लोणी काळभोर (ता. हवेली) परिसरात घडली होती. यातील अपहरण करणाऱ्या आरोपीला लोणी काळभोर पोलिसांनी २४ तासाच्या आत खडकी (पुणे) परिसरातून अटक केली आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी रितेश राहुल कांबळे (वय २१ रा. रेंज हिल, खडकी पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. १५ वर्षे वयाची पिडीत अल्पवयीन मुलगी लोणी काळभोर परिसरातील शाळेत दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. विद्यार्थिनी सोमवारी दुपारच्या सुमारास दुकानामध्ये जावून येते असे सांगून गेली होती. परंतु अज्ञात व्यक्तीने विद्यार्थिनीच्या अज्ञात पणाचा फायदा घेऊन तिला कशाची तरी फूस लावुन पळवून नेले आहे. अशी फिर्याद मुलीच्या आईने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी सदर गुन्ह्याची उकल करून आरोपींना पकडण्याच्या सूचना गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या तपास पथकाला दिल्या होत्या. सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना, पथकाला पिडीत मुलीला आरोपी रितेश कांबळे याने अपहरण करून पळवून नेल्याची माहिती एका खबऱ्यामार्फत मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व लोकेशनच्या आधारे आरोपीचा ठावठिकाणा काढला. आणि खडकी (पुणे) परिसरात छापा टाकून आरोपीला मोठ्या शिताफीने मंगळवार (२८ जानेवारी) रोजी जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. पोलिसांनी अल्पवयीन मुलीला तिच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे.
हे सुद्धा वाचा : सिंहगड रस्ता भागात दुचाकी चोरट्यांना पकडले; पाच दुचाकींसह लॅपटॉप जप्त
पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके करीत आहेत. सदरची कारवाई लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव, पोलीस हवालदार विलास शिंदे, सुनील नागलोत व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.