संग्रहित फोटो
पुणे : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण यासारख्या घटना घडत आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भिती निर्माण होत आहे. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गेल्या पाच महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने जेरबंद केले आहे. कात्रज परिसरात ही कारवाई करण्यात आली असून, त्याला पुढील कारवाईसाठी सहकारनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सोहम ऊर्फ सोन्या मनोहर थोरात (वय २१, रा. वडगाव बुद्रुक, जाधवनगर, भैरवनाथ मंदिराजवळ, सिंहगड रोड, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ७१/२०२६ दाखल असून भारतीय न्याय संहितेतील कलम १०९, १८९(२), १९१(३), ३५१(२), ३५२, ३(५), आर्म्स ॲक्ट कलम ४(२५) आणि महाराष्ट्र पोलिस कायद्यातील कलम ३७(१)(३) सह १३५ अंतर्गत गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात सोहम थोरात याचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक राहुल खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी तसेच कुंदन शिंदे, उज्वल मोकाशी, शंकर नेवसे, विजय पवार आदींच्या पथकाने केली आहे.
गंभीर गुन्ह्यांतील पाहिजे तसेच फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे अधिकारी व अंमलदार हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी पोलिस अंमलदार कुंदन शिंदे, विजय पवार आणि उज्वल मोकाशी यांना सोहम थोरात हा कात्रज चौक परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली. ही माहिती युनिट दोनचे प्रभारी वरिष्ठ निरीक्षक राहुल खिलारे यांना देण्यात आली. त्यानंतर पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन नाव-पत्ता विचारला असता त्याने सोहम ऊर्फ सोन्या मनोहर थोरात असे सांगितले. चौकशीत तो सहकारनगर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी असल्याचे स्पष्ट झाले. नंतर त्याला सहकारनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.




