
Rishabh Pant चा जीव तर वाचवला, पण स्वतः घेतले प्रेयसीसोबत विष, मृत्यूच्या दाढेत अडकलाय तरूण; उचलले टोकाचे पाऊल (फोटो सौजन्य-X)
टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतचा जीव वाचवणाऱ्या तरुणाने त्याच्या प्रेयसीसोबत विष प्राशन केले आहे. उपचारादरम्यान प्रेयसीचा रुग्णालयात मृत्यू झाला. तर रजत नावाचा तरुण रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. हे प्रकरण प्रेमात अपयशाचे असल्याचे सांगितले जात आहे. प्रेमात अपयश आल्याने दोघांनीही एकत्र आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. रजतवर रुरकी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
भारतीय यष्टीरक्षक ऋषभ पंत ३० डिसेंबर २०२२ रोजी एका रस्ता अपघातात जखमी झाला होता. नवीन वर्षाच्या निमित्ताने पंत दिल्लीहून रुरकी येथील त्याच्या घरी जात होता. याचदरम्यान डेहराडून महामार्गावर पंतच्या गाडीचा अपघात झाला. त्यानंतर दोन मुलांनी मिळून त्याचा जीव वाचवला, ज्यामध्ये रजत नावाच्या तरुणाचाही समावेश होता. पंतने मसीहा म्हणून त्याच्या आयुष्यात आलेल्या या तरुणांना स्कूटर भेट दिली होती.
दरम्यान शकरपूर गावातील मजरा बुच्चा बस्ती येथील रहिवासी सुशीलचा २५ वर्षीय मुलगा रजत आणि गावातील संतरामची २१ वर्षीय मुलगी मनू यांच्यात गेल्या पाच वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू होते. दोघांच्याही कुटुंबियांनी त्यांच्या लग्नाला परवानगी देण्यास नकार दिला होता. कुटुंबियांनी दोघांचेही लग्न वेगवेगळ्या ठिकाणी लावून देण्याच्या तयारीत होते. याप्रकरणी स्टेशन हाऊस ऑफिसर जयवीर सिंह यांनी सांगितले की, ९ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी दोघेही आपापल्या घरातून आले आणि शेतात पोहोचल्यानंतर त्यांनी विषारी पदार्थ प्राशन केला. दोघेही शेतात बेशुद्ध पडल्याची माहिती मिळताच त्यांच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी पोहोचून त्यांना उत्तराखंडमधील झाब्रेडा येथील नर्सिंग होममध्ये दाखल केले.
मंगळवारी उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला, तर मुलावर उपचार अजूनही सुरू आहेत. मुलीच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबीयांमध्ये एकच खळबळ उडाली. पोलिसांनी मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. मुलीच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, दोन दिवसांपूर्वी त्या तरुणाने त्यांच्या मुलीला आमिष दाखवून सोबत नेले आणि तिला काही विषारी पदार्थ खायला दिले. मुलीची आई कमलेश यांनी रजत आणि इतरांविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिस स्टेशनचे प्रभारी जयवीर सिंह म्हणतात की, या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. मुलीच्या आईने तरुणावर विष पाजल्याचा आरोप केला आहे. तसेच “दोघेही तासन्तास फोनवर बोलत असत, पण ते वेगवेगळ्या समुदायाचे असल्याने त्यांचे कुटुंबीय या नात्यावर खूश नव्हते. मुलीचे लग्न दुसरीकडे होणार होते. मुलीच्या कुटुंबाने तिला रजतला भेटण्यापासून रोखले होते, रजतचे कुटुंबही त्यांच्या नात्याविरुद्ध होते आणि त्याचे लग्न दुसऱ्या महिलेशी करण्याचा विचार करत असल्याची माहिती मिळत आहे.