संग्रहित फोटो
पिंपरी : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पिंपरीमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. तीन मित्र अंडाभुर्जी खाण्यासाठी गेले. तिथे एक तरुण सिगारेट ओढत होता. बाजूला जाऊन सिगारेट ओढ, असे त्याला सांगितल्याने त्याने ब्लेडने दोघांवर वार करत खून करण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. ७) रात्री साडेनऊच्या सुमारास कुदळवाडी, चिखली येथे घडली आहे. पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे.
जफर अहमद शोहराबअली शाह (२८, रा. कुदळवाडी, चिखली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. गणेश शिंदे (२४, रा. चिखली) यांनी याप्रकरणी शनिवारी (दि. ८) चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुष्कर नेवाळे, उदय ताले अशी जखमींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश शिंदे आणि त्यांचे मित्र पुष्कर व उदय हे शुक्रवारी रात्री कुदळवाडी येथे अंडाभुर्जी खाण्यासाठी गेले होते. अंडाभुर्जी खात असताना तिथेच जफर हा सिगारेट ओढत होता. त्याला ‘बाजूला जाऊन सिगारेट ओढ’, असे गणेश यांनी सांगितले. त्या कारणावरून जफर याने गणेश आणि त्यांच्या मित्रांसोबत वाद घातला. पुष्कर आणि उदय यांच्यावर ब्लेडने वार करत खून करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले. पोलिस उपनिरीक्षक राजेश मासाळ अधिक तपास करीत आहेत.
हे सुद्धा वाचा : पोलिस असल्याची बतावणी, दागिने ठेवण्याचा बहाणा; शिक्रापुरातील महिलेला लुटले
जेलमधून बाहेर आला अन् तिघांना तोडला
गेल्या काही दिवसाखाली कारागृहात राहून आलेल्या सराईत गुन्हेगार व त्याच्या साथीदारांनी तीन तरुणांवर किरकोळ वादातून तीक्ष्ण शस्त्राने वार करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना मुंढवा परिसरात घडली. एक महिन्यापुर्वीच सराईत कारागृहातून बाहेर आला होता. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात महेश गजसिंह उर्फ दाद्या उर्फ डी याच्यासह दोन ते तीन अनोळखी साथीदारांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या हल्यात अजय हनुमंत पवार (वय ३१), अमित राजेश परदेशी (वय २६) व सोहेश अलमले (वय २६) हे तिघे जखमी झाले आहेत. याबाबत तुषार मेमाणे (वय २८) यांनी तक्रार दिली आहे.
पुतण्याने केला चुलत्याचा खून
आर्थिक वादविवादातून पुतण्याने चुलत्यावर लोखंडी हत्याराने वार करून त्यांचा खून केल्याची घटना पाषाण येथे घडली आहे. याप्रकरणी चतुःशृंगी पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला असून तिघांना ताब्यात घेतले आहे. महेश जयसिंगराव तुपे (वय.५६,रा. पाषाण) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी महेश यांचा मुलगा वरद तुपे (वय १९) याने तक्रार दिली आहे. त्यावरून शुभम महेंद्र तुपे (वय २८), रोहन सूर्यवंशी (वय २०) आणि ओम बाळासाहेब निम्हण (वय २०, रा. सर्व पाषाण) यांना अटक केली आहे.