सौजन्य - नवराष्ट्र टीम
शिक्रापूर : रांजणगाव एमआयडीसी (ता. शिरुर) येथील व्हर्लपूल वेअर हाउसमधील तब्बल 37 लाखांचे फ्रीज व एसीसह आदी साहित्य चोरून नेणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात रांजणगाव एमआयडीसी पोलिसांना यश आले असून, त्यांच्याकडून सर्व साहित्य जप्त केले आहे. बाळू रघुनाथ गायकवाड, मयूर विलास सरोदे, संभाजी शिवाजी भोसले, जावेद उर्फ गौस आजम नजीर शेख, रमेश रामभाऊ खराडे, मुजफ्फर रमजान शेख, सलीम मुनीर शेख व दिपक रामदास मसकुले असे पोलिसांनी जेरबंद केलेल्या आरोपींची नावे आहे.
रांजणगाव एमआयडीसी येथील इंडोस्पेक लॉजिस्टिक पार्क येथे व्हर्लपूल कंपन्यांचे फ्रीज ठेवण्याच्या व्हर्लपूल वेअर हाउसमधून काही फ्रीज, एसी चोरीला गेलेले होते. याबाबत गोडावूनचे व्यवस्थापक याबाबत संदीप नारायण पवार (वय ३८ वर्षे रा. ग्रीन सिटी गोलेगाव रोड शिरुर ता. शिरुर जि. पुणे) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. याप्रकरणी पोलिसांनी आठ जणांवर गुन्हा दाखल केला होता, सदर गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज नवसारे, महिला पोलीस उपनिरीक्षक सविता काळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय शिंदे, पोलीस हवालदार विजय सरजिणे, तेजस रासकर, विलास आंबेकर, उमेश कुतवळ यांनी वेगवेगळ्या ठिकाणहून या गुन्ह्यातील आरोपींना ताब्यात घेत त्यांच्याकडे चौकशी करत त्यांनी चोरलेले फ्रीज व एसी जप्त केले.
यावेळी पोलिसांच्या पथकाने ७१ एसी, १९ मोठे फ्रीज, १६ वाशिंग मशीन, १८ डिश वाशर, ८५ मायक्रो ओह्न, ९ लहान फ्रीज, ६ इलेक्ट्रिक शेगडी असा तब्बल ३७ लाख १४ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला, यावेळी पोलिसांनी बाळू रघुनाथ गायकवाड, मुजफ्फर रमजान शेख, सलीम मुनीर शेख, दिपक रामदास मसकुले, संभाजी शिवाजी भोसले (सर्व रा. दरोडी ता. पारनेर जि. अहमदनगर, मयूर विलास सरोदे रा. सरदवाडी ता. शिरुर जि. पुणे), जावेद उर्फ गौस आजम नजीर शेख व रमेश रामभाऊ खराडे दोघे (रा. हुडको कॉलनी, शिरुर ता. शिरुर जि. पुणे) यांना अटक केली तर सर्व पोलीस पथकाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांनी कौतुक केले असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज नवसारे हे करत आहे.