संग्रहित फोटो
नवराष्ट्र/अमोल तोरणे : पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात गेल्या काही वर्षांत वाहनसंख्येत झपाट्याने वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. औद्योगिक वाढ, शैक्षणिक व रोजगार केंद्रांचे विस्तार आणि नागरिकांचा खासगी वाहनांकडे वाढता कल या सर्व घटकांमुळे ग्रामीण रस्त्यांवर वाहनांचा ताण दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या वाढत्या वाहनताणाचा थेट परिणाम वाहतुकीच्या सुरळीततेवर तर होतच आहे, पण अपघातांच्या संख्येतही लक्षणीय वाढ होत असल्याचे आकडेवारी स्पष्ट करते.
वाहनसंख्येतील झपाट्याने वाढ
पुणे ग्रामीण भागात २०२१ मध्ये नोंदणीकृत वाहनांची संख्या सुमारे ४ लाख ३० हजार होती. अवघ्या चार वर्षांत म्हणजे २०२५ पर्यंत ही संख्या ५ लाख ८५ हजारांवर पोहोचली आहे. याचा अर्थ एवढ्या अल्प कालावधीत १.५५ लाखांनी वाढ झाली आहे. या वाढीमुळे रस्त्यांवरील कोंडी, वाहतुकीतील अनियमितता आणि प्रवासातील विलंब हे नित्याचेच झाले आहे.
कोंडी आणि अपघातांचे वाढते प्रमाण
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग या महत्त्वाच्या महामार्गाचे काम पूर्णत्वाकडे असले तरी जिल्ह्यातील अनेक राज्यमार्ग व जिल्हा मार्गांवर वाहतुकीची कोंडी कायम आहे. विशेषतः बारामती, दौंड आणि खेड तालुक्यांमध्ये कोंडीची समस्या आणि अपघातांचे प्रमाण अधिक असल्याचे पोलिसांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. २०२५ या एकाच वर्षात ग्रामीण भागात ८६० हून अधिक अपघात नोंदवले गेले. यामध्ये अनेकांना प्राण गमवावे लागले असून, अपघातांमध्ये ३०% वाढ झाल्याचेही नोंदवले गेले आहे.
नागरिकांसाठी वाढता धोका
वाहनसंख्येच्या झपाट्याने वाढीमुळे रस्त्यांवरील प्रदूषण, प्रवासातील विलंब, कोंडी, आणि नागरिकांच्या सुरक्षिततेवर थेट परिणाम होत आहे. ग्रामीण रस्त्यांची रुंदी कमी असल्याने मोठ्या वाहनांना वाहतूक व्यवस्थापन करणे कठीण ठरते. गाव व वाड्यावस्त्यांकडे जाणारे रस्ते अतिशय अरुंद असल्यामुळे अपघातांची शक्यता अधिक वाढते.
प्रशासनाच्या उपाययोजना आणि तज्ञांचे मत
वाहतुकीवरील वाढता ताण लक्षात घेऊन प्रशासनाकडून काही उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.
वाहतूक तज्ञांच्या मते, सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढविणे, वाहतूक नियम काटेकोरपणे पाळणे, पायाभूत सुविधा नियोजनबद्ध उभारणे आणि ग्रामीण भागातील रस्त्यांची रुंदी वाढविणे हेच अपघात कमी करण्यासाठी व वाहतूक सुरळीत करण्यासाठी महत्त्वाचे उपाय ठरू शकतात.