
जयसिंगपुरा भागातील रहिवासी असलेले सुदाम वामनराव राजभोज (वय ८४) हे सेवानिवृत्त प्राध्यापक आहेत. सप्टेंबर २०२५ मध्ये सायबर भामट्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. “मुंबईच्या कुलाबा पोलीस ठाण्यात तुमच्याविरोधात गुन्हा दाखल आहे,” असे सांगून भामट्यांनी त्यांना धमकावण्यास सुरुवात केली. अवैध संपत्ती, मनी लॉन्ड्रिंग आणि ईडी चौकशीचे भय दाखवत स्वतः केंद्रीय तपास यंत्रणांशी संबंधित असल्याचे भासवले.
अटक टाळायची असेल तर तुमच्या आर्थिक व्यवहारांची पडताळणी करावी लागेल, असे सांगून वृद्ध प्राध्यापकांकडून आधी एक हस्तलिखित अर्ज लिहून घेण्यात आला. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यांची गोपनीय माहिती मिळवून, त्यांच्या नावावर असलेली २८ लाख ५० हजार रुपयांची मुदत ठेव (FDR) मोडण्यास भाग पाडले. ही सर्व रक्कम आरटीजीएस (RTGS) द्वारे आरोपींच्या बँक खात्यांवर वर्ग करण्यात आली. इतर व्यवहारांसह भामट्यांनी एकूण ३२ लाख ५० हजार रुपये उकळले. विश्वास संपादन करण्यासाठी भामट्यांनी चक्क सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court) बनावट पत्रही प्राध्यापकांना दाखवले होते.
अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार; पीडिता गर्भवती होताच धक्कादायक प्रकार उघड
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर प्राध्यापकांनी बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी बँक खाती, मोबाईल क्रमांक, कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) आणि एसडीआर (SDR) चा सखोल तांत्रिक अभ्यास केला. आरोपींचे लोकेशन गुजरातमधील जुनागढ येथे असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलीस पथकाने तातडीने गुजरात गाठून दोघांना ताब्यात घेतले. न्यायालयाने आरोपींना २२ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीस तपासात आणखी एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या बँक खात्यात देशभरातील विविध सायबर गुन्ह्यांतील रक्कम जमा होत होती. एकाच दिवसात या खात्यात तब्बल ८८ लाख रुपये जमा झाल्याची नोंद पोलिसांना आढळली आहे. ही रक्कम तात्काळ इतर विविध खात्यांमध्ये वळवली जात होती. त्यामुळे या प्रकरणामागे आंतरराष्ट्रीय किंवा देशव्यापी मोठे सायबर रॅकेट कार्यरत असल्याचा पोलिसांना संशय आहे.
प्राथमिक चौकशीत दोन्ही आरोपी हे खताच्या व्यवसायाशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या खत व्यवसायाच्या आडून हे भामटे सायबर गुन्हेगारी आणि बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांचे जाळे चालवत होते का, याचा शोध आता बेगमपुरा पोलीस घेत आहेत.