सौजन्य फोटो - सोशल मिडीया
शहीद सुभेदार मेजर सत्यवान यांचे पार्थिव चंदीगडहून त्यांच्या मूळ गावी देवरिया येथे नेले जात होते. रुग्णवाहिकेत त्यांचा मुलगा गौरव सिंह, भाऊ राजन चौधरी, पुतण्या राम समुझ सिंह आणि चालक जसपाल हे होते. शहीद पित्याला अखेरचा निरोप देण्यासाठी कुटुंबीय पार्थिवासोबत गावी जात होते. मात्र, सुलतानपूर जिल्ह्यातील हलियापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पूर्वांचल एक्सप्रेसवेवर अज्ञात भरधाव वाहनाने रुग्णवाहिकेला जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की रुग्णवाहिकेचे मोठे नुकसान झाले.
या अपघातात गौरव सिंह आणि रुग्णवाहिका चालक जसपाल यांचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेले राजन चौधरी आणि राम समुझ सिंह यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. एका बाजूला रुग्णवाहिकेत शहीद सुभेदार मेजर सत्यवान यांचे पार्थिव आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्याच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, अशा दुर्दैवी घटनेने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शहीद जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी सज्ज असलेल्या गावात एकाच वेळी चार जणांच्या मृत्यूची बातमी पोहोचल्याने हळहळ व्यक्त होत आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शहीद सुभेदार मेजर सत्यवान यांचे पार्थिव सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. दरम्यान, अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहनाचा पोलीस शोध घेत असून, या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.






