फोटो सौजन्य सोशल मिडिया
Sherewadi double murder case : बारामती तालुक्यातील शेरेवाडी येथे घरात घुसून दोन वृद्ध महिलांची निर्घृण हत्या करून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटल्याच्या दुहेरी हत्याकांडाचा बारामती पोलिसांनी छडा लावला आहे. या प्रकरणी विकास उर्फ आप्पा राजेंद्र लडकत (वय २५, रा. शेरेवाडी, ता. बारामती) याला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून चोरी केलेले सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
शेरेवाडी येथे अज्ञात चोरट्याने जबरदस्तीने घरात प्रवेश करून घरातील कपाटातील सामानाची उचकापाचक केली. त्यानंतर घरासमोरील ओट्यावर झोपलेल्या हिंदूमती मारुती लडकत (वय ७५) आणि कृष्णाबाई कुंडलिक लडकत (वय ५५), दोघी रा. शेरेवाडी, यांच्या अंगावरील सुमारे सहा लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून घेण्यात आले. त्यानंतर धारदार हत्याराने त्यांच्या मानेवर व गळ्यावर गंभीर वार करून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेने शेरेवाडी परिसरात मोठी खळबळ उडाली होती.
अबब! पारा तापला की राव! Pune शहराला ऑक्टोबर हिटचा तडाखा; तापमान थेट…
घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत संशयितांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. तपासादरम्यान विकास उर्फ आप्पा लडकत याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता तो गोंधळलेल्या अवस्थेत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी करून विश्वासात घेतले असता त्याने सोन्याचे दागिने चोरी करण्यासाठी भावकीतील दोन्ही महिलांवर कोयत्याने वार करून त्यांची हत्या केल्याची कबुली दिली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
आरोपीने चोरी केलेले सोन्याचे दागिने पोलिसांनी त्याच्याकडून जप्त केले आहेत. त्यामुळे या दुहेरी हत्याकांडाच्या तपासात महत्त्वाची प्रगती झाली आहे. या कारवाईची माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम, बारामती पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी मनीषा ओमासे यांच्यासह तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, या प्रकरणातील आरोपीने नेमका कोणत्या उद्देशाने गुन्हा केला, हत्येसाठी वापरलेले हत्यार, गुन्ह्यात अन्य कोणाचा सहभाग आहे का, तसेच चोरीच्या मुद्देमालाबाबत अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.






