सणसवाडीत दोन मटका अड्ड्यांवर छापा; शिक्रापूर पोलीसांची मोठी कारवाई
शिक्रापूर : सणसवाडीत दोन ठिकाणी सुरु असलेल्या मटका अड्ड्यांवर शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने छापे टाकत कारवाई केली आहे. याप्रकरणी दिपक विजय मोरे (वय ३१), आतिष सुखदेव दरेकर (वय ३०), विकी बाळासाहेब हरगुडे (वय २९), प्रवीण बबनराव दरेकर (वय ३३) व सलीम हसन शेख (वय ४९ सर्व रा. सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार दामोदर तुळशीराम होळकर (वय ४१ रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.
सणसवाडी (ता. शिरुर) येथील जय अंबिका कला केंद्रच्या भिंतीच्या बाजूला काही जण नागरिकांकडून पैसे घेऊन मटका खेळवत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांना मिळाली. त्यांनतर पोलीस उपनिरीक्षक विजय मस्कर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वेरणनाथ मुत्तनवार, पोलीस हवालदार रविकिरण जाधव यांनी हॉटेल जय अंबिका कला केंद्रच्या भिंतीच्या बाजूला जाऊन छापा टाकला. यात काही जण नागरिकांकडून पैसे घेऊन त्यांना कागदावर आकडे लिहून देऊन मटका खेळवत असल्याचे दिसून आले. दरम्यान पोलिसांनी दोन्ही ठिकाणच्या मटका खेळवणाऱ्या लोकांना ताब्यात घेत त्यांच्या जवळील जुगाराचे साहित्य व रक्कम असा अकरा हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. पुढील तपास पोलीस हवालदार रविकिरण जाधव हे करत आहे.
लोणावळ्यातील जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई
गेल्या काही दिवसाखाली लोणावळा शहर पोलिसांनी लोणावळा शहर हद्दीमध्ये बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या मटका अड्ड्यांवर धडाकेबाज कारवाई करीत सदरचे अड्डे बंद केले आहेत. पोलिसांनी एकूण तीन मटका अड्ड्यांवर छापा टाकून ४ आरोपींना ताब्यात घेतले आहे. तसेच सहा हजार चारशे दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याशिवाय बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या एका व्यक्तीवर कारवाई करीत त्याच्या ताब्यातील चौदाशे रुपयांच्या चाळीस मद्याच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. पोलीस निरीक्षक अरुण फुगे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल लाड यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा शहर पोलिसांनी केलेल्या कारवाई मध्ये किरण राजु जाधव (वय ३२ वर्षे,) विकास भिमाजी पैलवान (वय ३२, दोघे रा. गवळीवाडी लोणावळा), वैभव भगवान साठे (वय २५ वर्ष ,रा. ओळकाईवाडी, कुसगाव ता. मावळ जि.) आणि अशोक जगन्नाथ फाळके (रा.आण्णाभाऊ वसाहत सिद्धार्थनगर, लोणावळा) या चौघांना तीन वेगवेगळ्या अड्ड्यावर लोकांकडून पैसे घेऊन कल्याण मटका नावाचा जुगार खेळताना ताब्यात घेतले. या सर्वांवर महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.