
Pune Crime: नाव सारखं असल्याचा फायदा घेतला, जमीनही परस्पर विकली; 3 कोटींच्या फसवणुकीने पिंपरीत खळबळ
पिंपरी : नावातील साधर्म्याचा गैरफायदा घेत DRDO ऑफिसर्स सहकारी गृहनिर्माण संस्थेची तब्बल 3 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या संस्थेच्या मालकीची सुस येथील जमीन कोणतीही अधिकृत परवानगी किंवा अधिकार नसताना परस्पर दुसऱ्या व्यक्तींना विकल्याचा आरोप आहे. या प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सेवानिवृत्त अधिकारी वीरेंद्र कुमार दिनदयाल वर्मा (रा. बाणेर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दादा राम देव ओंकार, रणजित कुमार जदुनाथ सुर (रा. पाषाण), शैलेश रामराव गुरुनुले (रा. वाकड), एका महिलेसह इतर साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी नावातील साधर्म्याचा फायदा घेतल्याचा आरोप आहे. फिर्यादींच्या ‘डीआरडीओ ऑफिसर्स सहकारी गृहनिर्माण संस्थे’ च्या मालकीची सुस येथील जमीन आरोपींनी कोणतीही अधिकृत परवानगी न घेता परस्पर विकल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. संबंधित जमिनीची विक्री गुलाब चांदोरे, मंगेश चांदोरे, संदीप चांदोरे आणि अक्षय चांदोरे यांना करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या व्यवहारातून सुमारे 3 कोटी रुपयांची आर्थिक अफरातफर आणि फसवणूक झाल्याचा आरोप आहे.
संस्थेच्या मालकीची जमीन परस्पर विकण्याचा अधिकार आरोपींना नसतानाही त्यांनी हा व्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. नावातील साधर्म्याचा फायदा घेऊन संस्थेची जमीन परस्पर विक्री केल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बावधन पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, जमीन व्यवहार, संबंधित कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहारांची पडताळणी केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.