
Representative image
महाज्योतीच्या अधिकृत सूचनेनुसार सन २०२६-२७ या वर्षातील विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठीची चाळणी परीक्षा ७ ते ९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. मात्र, आंबेगाव बुद्रुक येथील संबंधित परीक्षा केंद्रावर नियोजित वेळेत परीक्षा सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले, अशी माहिती समोर आली आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, संबंधित केंद्रावर संगणक उपलब्ध नसल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या असून, या गोंधळामुळे परीक्षा रद्द करण्यात आल्याचे वृत्त आहे.
महाज्योतीच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या व सामाजिकदृष्ट्या वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना UPSC, MPSC, SSC, Banking, Railway आदी स्पर्धा परीक्षांच्या पूर्व प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली जाते. अशा परीक्षांमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थी अनेक दिवस तयारी करतात. त्यामुळे परीक्षा केंद्राच्या नियोजनातील त्रुटींमुळे विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागणे ही गंभीर बाब आहे.
या पार्श्वभूमीवर आंबेगाव परीक्षा केंद्रातील संपूर्ण प्रकाराची निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, संबंधित केंद्राची जबाबदारी निश्चित करण्यात यावी आणि दोषी आढळणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
आंबेगाव केंद्रावर परीक्षा देऊ न शकलेल्या एकाही विद्यार्थ्याचे नुकसान होऊ नये. संबंधित केंद्रावरील परीक्षा पुन्हा स्वतंत्रपणे घेण्यात यावी किंवा सर्व बाधित विद्यार्थ्यांना समान पर्यायी संधी देण्यात यावी. तसेच परीक्षेच्या निकालावर या तांत्रिक गोंधळाचा कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नाही, याची महाज्योती प्रशासनाने लेखी हमी द्यावी.
या प्रकरणी आमदार रोहित पवार यांनीही विद्यार्थ्यांचा मुद्दा उपस्थित केला असून, ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनी महाज्योतीच्या व्यवस्थापकीय संचालकांशी याबाबत चर्चा केल्याचे सांगण्यात आले आहे. महाज्योतीच्या व्यवस्थापनाकडून आंबेगाव केंद्रावरील परीक्षा रद्द करून पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.