
Thane News: पूर्णेकर हत्या महिनाभर आधीच ठरली? मॉक ड्रिल करून आखला कट; दोन शूटर अलिबागजवळून ताब्यात
ठाणे : शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाचे विभागप्रमुख प्रदीप उर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून, पोलिसांच्या हाती धक्कादायक माहिती लागली आहे. पोलिस तपासानुसार, पूर्णेकर यांच्या हत्येचा कट काही आठवडे आधीच आखण्यात आल्याचा संशय आहे. हल्ल्यापूर्वी आरोपींनी पूर्णेकर यांच्या दैनंदिन हालचालींवर लक्ष ठेवण्यासोबतच हत्या कशी करायची, याची मॉक ड्रिल केल्याची माहिती तपासातून समोर आल्याचे सांगितले जात आहे. हत्येनंतर आरोपींच्या शोधासाठी ठाणे गुन्हे शाखेने नऊ पथके तयार केली होती. पोलिसांनी पप्या शिंदे याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून इतर आरोपींची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने ठोस माहिती दिली नसल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले.
यानंतर पप्या शिंदेच्या संपर्कात असलेल्या काही व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. या चौकशीतून फरार आरोपी कोणत्या ठिकाणी लपून बसले असण्याची शक्यता आहे, याबाबत पोलिसांना माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी अलिबागजवळील एका दूध डेअरीवर छापा टाकला. या कारवाईत निखिल यादव आणि नितेश पवार यांना ताब्यात घेण्यात आले. दोघेही तेथे लपून बसल्याचे समोर आले. त्यांचा गोव्याच्या दिशेने पळून जाण्याचा प्रयत्न असल्याचा पोलिसांचा संशय असल्याचे वृत्त आहे.
नितेश पवार उर्फ भावड्या याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. तपासानुसार, निखिल यादवने पूर्णेकर यांच्यावर गोळीबार केला, तर नितेश पवारने त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याचा आरोप आहे.
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपींनी हत्येपूर्वी पूर्णेकर यांच्या हालचालींची माहिती घेतली होती. हल्ल्यानंतर घटनास्थळावरून पसार होण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आल्याचा तपास यंत्रणेला संशय आहे. तसेच हत्येची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यापूर्वी आरोपींनी मॉक ड्रिल केल्याची माहितीही समोर आली आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात वापरलेल्या दोन दुचाकी जप्त केल्या असून, आरोपींच्या हालचाली, शस्त्रांचा पुरवठा आणि हत्येच्या कटामागील इतर व्यक्तींचा शोध सुरू आहे.