
ठाण्यात शिवसेना यूबीटी विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकरांची गोळ्या झाडून हत्या; मुलाचे गंभीर आरोप
ठाणे : मानपाडा परिसरात ठाकरे गटाच्या शिवसेनेचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची सोमवारी (२९ सप्टेंबर) गोळ्या झाडून आणि धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. पूर्णेकर यांच्या मानपाडा येथील कार्यालयाबाहेर हा हल्ला झाला. हल्ल्यानंतर त्यांना कापूरबावडी परिसरातील इन्फिनिटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी पप्या शिंदे आणि आकाश निमसे या दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.
प्रदीप पूर्णेकर यांची हत्या जुन्या वादातून करण्यात आल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. पूर्णेकर कुटुंबीयांनी ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर हत्येचा कट रचल्याचा संशय व्यक्त केला आहे. दरम्यान, या आरोपांची पोलिसांकडून चौकशी सुरू असून, तपासातून नेमके कारण आणि हत्येमागील सूत्रधार स्पष्ट होणार आहेत. घटनेनंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून, दोन व्यक्ती चेहऱ्यावर रुमाल बांधून दुचाकीवरून पूर्णेकर यांच्या कार्यालयाच्या दिशेने जाताना दिसत असल्याचे समोर आले आहे. या फुटेजच्या आधारे पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.
हेही वाचा: Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?
प्रदीप पूर्णेकर यांचा मुलगा राम पूर्णेकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना या प्रकरणाबाबत गंभीर आरोप केले आहेत. काही दिवसांपूर्वी नीलकंठ परिसरात राजेंद्र शिंदे आणि सध्या संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या व्यक्तींना एकत्र उभे असताना पाहिल्याचा दावा त्यांनी केला. आपण तेथून जात असताना संबंधित व्यक्ती दचकल्या होत्या, असेही राम यांनी सांगितले. त्यानंतर एका व्यक्तीने आपल्याकडे येऊन ‘तू प्रदीप पूर्णेकर यांचा मुलगा आहेस का?’ अशी विचारणा केल्याचे राम यांनी सांगितले. त्यामुळे आपल्याला काहीतरी कट सुरू असल्याचा संशय आला होता आणि आपण वडिलांना याबाबत आधीच सांगितले होते, असा दावा त्यांनी केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, प्रदीप पूर्णेकर यांनीही त्यांना रात्री दहानंतर घराबाहेर पडू नकोस, असा सल्ला दिला होता.
प्रदीप पूर्णेकर यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी जे. जे. रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. मात्र सर्व आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका कुटुंबीयांनी घेतली आहे. कापूरबावडी पोलिस ठाण्यात बसून राहणार असून, सर्व आरोपी अटक झाल्यानंतरच पुढील प्रक्रिया करण्याचा निर्णय घेऊ, असे राम पूर्णेकर यांनी सांगितले.
मीनाक्षी शिंदे यांची कथित ऑडिओ क्लिप यापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या क्लिपमध्ये आपल्या वडिलांचे नाव घेऊन धमकी देण्यात आल्याचा दावा राम पूर्णेकर यांनी केला. त्यामुळे मीनाक्षी शिंदे यांच्यावर आपला संशय असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पप्या शिंदे हा आपल्या वडिलांचा जुना मित्र असल्याचे राम यांनी सांगितले. घटनेच्या दोन दिवस आधी तो पूर्णेकर यांच्या कार्यालयात आला होता आणि त्यांच्यासोबत बराच वेळ बोलला होता, असा दावाही त्यांनी केला. हल्ल्याच्या वेळी कार्यालयात फारसे लोक नव्हते, असेही त्यांनी सांगितले. पप्या शिंदे स्वतःला गोळी लागल्यानंतर हल्लेखोरांना पकडल्याचे सांगत होता; मात्र त्याला कोणतीही दुखापत झाली नसल्याचा दावा करत राम यांनी त्याच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित केला. पप्या शिंदे रुग्णालयातही आला होता आणि तेथे एका व्यक्तीला शिवीगाळ करत असल्याचे राम यांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्यालाच संशयित म्हणून ताब्यात घेतल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरू असून पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींची माहिती आणि इतर पुराव्यांच्या आधारे हल्ल्यामागील कारणांचा शोध घेतला जात आहे. ‘माझ्या वडिलांनी आयुष्यभर न्यायासाठी काम केले. त्यामुळे त्यांना न्याय मिळायला हवा,’ अशी मागणी राम पूर्णेकर यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्याशी अद्याप संपर्क झालेला नसल्याचेही त्यांनी सांगितले.