संग्रहित फोटो
ईश्वरपूर : चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा ओढणीने गळा आवळून खून केल्यानंतर तिचा मृतदेह पत्र्याच्या पेटीत लपवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मांगले (ता. शिराळा) येथील मंगेश चंद्रकांत कांबळे (वय ३५) याला ईश्वरपूर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच त्याला १० हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. जिल्हा न्यायाधीश क्रमांक १ देविदास एच. केळूसकर यांनी हा निकाल दिला आहे. मंगेश कांबळे आणि प्राजक्ता यांचा सुमारे आठ वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. विवाहानंतर ते पनवेल येथे राहत होते. त्यांना शिवम आणि शिवण्या अशी दोन मुले आहेत.
नातेवाईकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
काही दिवसांसाठी मंगेश कुटुंबासह मांगले येथे आई व भावाकडे आला होता. याच काळात पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन मंगेशकडून तिच्याशी वारंवार वाद होत होते. २७ मार्च २०२५ रोजी पती-पत्नीमध्ये पुन्हा वाद झाला. या वादाचे पर्यवसान मंगेशने प्राजक्ताचा ओढणीने गळा आवळून खून करण्यात झाले. खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याने प्राजक्ताचा मृतदेह दुसऱ्या खोलीतील पत्र्याच्या पेटीत ठेवला. पेटी बंद करून खोलीला कुलूप लावले आणि तो तेथून निघून गेला. दरम्यान, प्राजक्ता घरातून निघून गेल्याचे सांगून आरोपीने नातेवाईकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या घटनेचा महत्त्वाचा धागा ठरला तो प्राजक्ताचा अवघ्या सहा वर्षांचा मुलगा शिवम.
सहा वर्षांच्या मुलाची साक्ष ठरली निर्णायक
शिवमच्या डोळ्यादेखत हा प्रकार घडला होता. त्याने नातेवाईकांना घडलेली घटना सांगितल्यानंतर प्राजक्ताच्या बेपत्ता होण्यामागील सत्य समोर आले. नातेवाईकांनी मंगेशला शिराळा पोलिस ठाण्यात आणले. तेथे त्याने पत्नीचा खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी सखोल तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकार पक्षाने १६ साक्षीदार तपासले. यामध्ये मयत प्राजक्ताची आई रंजना, अर्जुन चांदणे, प्रत्यक्षदर्शी मुलगा शिवम कांबळे, पंच साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक बनसोडे, डॉ. अनिरुद्ध काकडे तसेच तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या.






