
भरधाव वाहनातून दहशत निर्माण करणाऱ्यांना दणका! बारामती पोलिसांनी केली 'ही' मोठी कारवाई
बारामती : सार्वजनिक वर्दळीच्या रस्त्यावर भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवून नागरिकांमध्ये दहशत निर्माण केल्याप्रकरणी बारामती शहर पोलिसांनी तातडीने कारवाई केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करून संबंधित चारचाकी वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले असून, आरोपींच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची तसेच प्रतिबंधक कारवाईची छाननी सुरू करण्यात आली आहे.
५ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे दोन वाजता इंदापूर चौक परिसरात एमएच ४२ बीएन १०९५ क्रमांकाचे चारचाकी वाहन अत्यंत वेगाने व हयगयीने चालविण्यात आले. इतर वाहनांना अचानक कट मारणे, धोकादायकरीत्या ओव्हरटेक करणे, तसेच वाहनाच्या टपावर एक व्यक्ती बसणे व दुसऱ्या व्यक्तीने खिडकीतून शरीर बाहेर काढून नागरिकांकडे हातवारे करणे, असे प्रकार घडले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३६६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम २८१, २८५ तसेच मोटार वाहन अधिनियमातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश बापू लोंढे, किशोर संजय ढोरे उर्फ मोठा डावर व एका अनोळखी व्यक्तीचा गुन्ह्यात समावेश आहे.
किशोर ढोरे याच्याविरुद्ध यापूर्वी विविध गुन्ह्यांची नोंद असल्याने त्याच्या पूर्वइतिहासाची व प्रतिबंधक कारवाईची छाननी सुरू आहे. तो मोक्का प्रकरणात जामिनावर बाहेर असल्याची बाबही न्यायालयीन अभिलेखांच्या आधारे तपासली जात आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पाटील, पोलीस हवालदार रामचंद्र शिंदे, पोलीस शिपाई अक्षय सिताफ, महिला पोलीस शिपाई भाग्यश्री देवकाते आणि पोलीस शिपाई मनोज अनुभुले यांनी कारवाईत सहभाग घेतला.
हे सुद्धा वाचा : प्रेयसीसोबत बोलल्यावरून वाद, मित्रानेच केली मित्राची हत्या; यवतमाळमधील घटनेनं खळबळ
सार्वजनिक शांतता व नागरिकांच्या सुरक्षिततेला बाधा आणणाऱ्यांविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा बारामती शहर पोलिसांनी दिला आहे. तसेच नागरिकांनी धमकी, दहशत किंवा अन्य गुन्हेगारी त्रासाबाबत निर्भयपणे पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांनी केले आहे.