सौजन्य - एआय
पुणे : एफडीएकडून राज्यभरात कारवाईचा धडाका सुरुच आहे. सणासुदीच्या काळातही अन्न भेसळ आणि अस्वच्छतेविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठी कारवाई सुरू केली आहे. पुण्यातील द न्यू पूना क्लब लिमिटेडवर अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. क्लबच्या स्वयंपाकघराची तपासणी करताना अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेशी संबंधित गंभीर त्रुटी आढळून आल्याने FDA ने क्लबचा अन्न परवाना तात्काळ निलंबित केला आहे.
कॅम्प परिसरातील क्लबमध्ये तपासणीदरम्यान झुरळे आणि इतर कीटकांचा प्रादुर्भाव तसेच अन्नसुरक्षा नियमांशी संबंधित अनेक उल्लंघनं आढळल्याची माहिती FDA अधिकाऱ्यांनी दिली आहे. FDA च्या विशेष तपासणी मोहिमेदरम्यान न्यू पूना क्लबच्या किचनमध्ये स्वच्छतेच्या नियमांकडे दुर्लक्ष झाल्याचं आढळून आलं. तपासणीदरम्यान जिवंत झुरळे आणि इतर कीटक आढळले. तसेच अन्नसुरक्षा नियमांमधील Schedule 4 मधील विविध तरतुदींचं उल्लंघन झाल्याचं FDA ने नमूद केलं आहे.
स्वयंपाकघरातील अस्वच्छ परिस्थितीमध्ये उंदराची विष्ठा, साचलेलं पाणी, तेलकट पृष्ठभाग तसेच फ्रीजजवळील अस्वच्छ शौचालयासारख्या बाबींचाही समावेश आहे. त्यामुळे अन्न तयार करण्याच्या ठिकाणी स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या निकषांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. FDA ने या परिस्थितीचा सार्वजनिक आरोग्याशी थेट संबंध असल्याचं नमूद करत क्लबचा अन्न परवाना तात्काळ निलंबित केला आहे.
हे सुद्धा वाचा : अहिल्यानगरमध्ये २ भयानक घटना! महिलेसह तरुणीवर अत्याचार; वॉशरुमचा दरवाजा ढकलला अन्…
विशेष तपासणी मोहीम
पुणे FDA विभागाने आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर 10 ते 15 सप्टेंबर 2026 या कालावधीत विशेष अन्नसुरक्षा तपासणी मोहीम राबवली. पुणे शहर आणि जिल्ह्यातील विविध खाद्य आस्थापनांची तपासणी करण्यात आली. या मोहिमेदरम्यान एकूण 14 आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. या तपासणीत लेबलिंगमधील त्रुटी, दिशाभूल करणारी माहिती आणि भेसळीचा संशय अशा कारणांमुळे तब्बल 56.36 लाखांचा खाद्यसाठा जप्त करण्यात आला आहे.
गणेशोत्सवापूर्वी एफडीएकडून पनीर, खवा जप्त
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पनीर, खवा आणि माव्याची मागणी वाढण्यापूर्वीच अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) बुधवार पेठ परिसरात धडक कारवाई केली. या कारवाईत सुमारे १० हजार किलो पनीर आणि पाच हजार किलो खवा, असा एकूण १५ हजार किलो साठा जप्त करण्यात आला. जप्त साठ्यात तीन कंटेनरमधून आणलेल्या पनीरचा समावेश आहे. या पदार्थांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.






