गुन्हे शाखेची पुनर्रचना; तपासाला मिळणार गती! चोरट्यांसाठी आता...
पुणे/अक्षय फाटक : वाढलेली गुन्हेगारी, तसेच शहर आयुक्तालयाची वाढलेली हद्द आणि अपुऱ्या मनुष्यबळ व महत्वाचे म्हणजे, गेल्या काही वर्षात गुन्हे शाखेला बंदोबस्त शाखा म्हणून मिळालेले उपहासात्मक मिळालेली पदवी पुसण्यासाठी आणि गुन्हे शाखेचे कामकाज प्रभावी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी गुन्हे शाखेची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासोबतच मनुष्यबळ वाढवून गुन्हे शाखेतील काही प्रमुख पथकांना कुठलाही बंदोबस्त न देण्याचाही निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुढील काळात गुन्हे शाखेच्या कामकाजात सुधार होईल, अशी अपेक्षा आहे.
राज्यभरात पुणे पोलिसांची गुन्हे शाखा नावाजलेली आहे. गेल्याच वर्षा-दीड वर्षांपुर्वी शाखेने मोठ-मोठ्या गुन्ह्यांचा छडा लावत जलदगतीने तपास पुर्ण केला होता. ललित पाटील ड्रग्ज प्रकरण, गँगस्टरच्या खूनातील आरोपींना आठ तासात अटक करणे, आंतरराष्ट्रीय ड्रग्ज प्रकरण, असे अनेक प्रकरणांचा तपास कौशल्याने व जलदगतीने पुर्णत्वास नेला होता. परंतु, काही पथके ही नावालाच होती. त्यांचे नेमके कामकाज काय? असा प्रश्न दस्तरखुद वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच पडला होता. वार्षिक आढावा घेतल्यानंतर दाखविण्यासाठी केलेल्या कामकाजाशिवाय ठोस असे काहीच नव्हते. वाहन चोरीचे ग्रहण पुण्याला लागून आता जवळपास दहा वर्षांचा काळ पुर्ण होत आहे. वाढत्या वाहन चोरीसाठी दोन खास पथके वाहन चोरींना पकडण्यासाठी आणि या घटनांना आळा घालण्यासाठी स्थापन केली होती. पण, त्यांची कामगिरीचा लेखाजोखा पाहिल्यानंतर ही पथके नेमकी करतात काय असा प्रश्न विचारण्यात येत आहे.
यासोबतच काही आणखी अशी पथके फक्त नावालाच आहेत. त्यांच्याकडून ठोस असे काहीच नव्हते. तसा गुन्हेगारांवर खऱ्या अर्थांने गुन्हे शाखेचा दरारा असायला हवा. पण, गेल्या काही वर्षात गुन्हे शाखा म्हणजे, बंदोबस्त शाखा आणि वरिष्ठांनी दिलेल्या गुन्ह्यांचा तपास पुर्ण करण्यातच मग्न असते. एकाच गुन्ह्यात सर्व गुन्हे शाखा मागे लागते. त्यामुळे आपसूकच मुळ उद्देशच गुन्हे शाखेचा पुर्ण होत नाही. त्यासोबतच खास व महत्वाच्या घडामोडींवर देखील गुन्हे शाखेचे लक्ष असते. गुन्हेगारी वर्तुळात काय सुरू आहे, याची माहिती असणे आवश्यक असते. पण, सध्याच्या गुन्हे शाखेत असे काही उरलेले नाही.
त्यामुळे गुन्हे शाखेची पुनर्रचना आवश्यक होती. त्यासोबत काही ठरावीक टास्क त्यांना देणे, बंदोबस्त किंवा एखाद्या गुन्ह्यात सर्वच पथके सहभागी करणे हे बंद होणार आहे. नव्या गुन्हे शाखेच्या पुनर्रचनेत फक्त ‘फोकस’ कामकाज केले जाणार आहे.
गुन्हे शाखेचे प्रमुख सहा यूनिट आणि खंडणी विरोधी पथक, अंमली पदार्थ विरोधी पथक, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक यांची प्रत्येक दोन अशी सहा मिळून एकूण १२ पथके आहेत. शहरातील ३९ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गुन्हे शाखा यूनिटच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाते. गुन्ह्यांचा समांतर तपास केला जातो. त्यासाठी झोननिहाय यूनिटचे कामकाज वाटून दिलेले आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून शहराची हद्द वाढली आहे. नव्याने सात पोलीस ठाणे कार्यान्वित झाले आहेत. वाढलेल्या पोलीस ठाण्यांमुळे काही यूनिटच्या कार्यकक्षेत वाढ झाली आहे. या सर्व बाबींचा विचार करता ही पुनर्रचना करण्यात येणार आहे.
काही यूनिटमध्ये अतिरीक्त पोलीस ठाण्यांचा समावेश केला जाईल. तर, काही यूनिटमधून पोलीस ठाणी वगळली जाणार आहेत. नागरिकांचा गुन्हे शाखेची जास्तीत जास्त कनेक्ट राहण्यासह शहराचा भौगोलिक विचार करून काही यूनिटची कार्यालये ही मध्यवर्ती भागात आणली जाणार आहेत. यामाध्यमातून समान कामकाजाचे वाटप आणि गुन्हे शाखेचे कामकाज प्रभावी करण्यावर भर देण्यात येणार आहे.
बंदोबस्त नसलेली तीन पथके
शहरात चैन स्नॅचिंग, वाहनचोरी, घरफोड्यांचे प्रमाण मोठे आहे. यासाठी गुन्हे शाखेचे तीन स्वतंत्र पथक तयार केले असून, या पथकांच्या माध्यमातून अशा प्रकारचे गुन्हे रोखण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. एक अधिकारी आणि आठ ते दहा कर्मचार्यांचा या पथकांत समावेश असेल. ही पथके संपुर्ण शहरभर गस्त घालतील. विशेष म्हणजे या पथकांना प्रभावीपणे काम करता यावे, यासाठी कुठलाही बंदोबस्त किंवा इतर कामकाज देण्यात येणार नाही.
गुन्हे शाखेची पुनर्रचना करण्याचे काम हाती घेतले आहे. वाढलेली शहराची हद्द, नव्याने तयार झालेली पोलीस ठाणी यांचा विचार करून ही पुनर्रचना केली जाईल. तर, अतिरीक्त मनुष्यबळासाठी देखील प्रयत्न केले जात आहेत.
– शैलेश बलकवडे, अतिरीक्त पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा.