
नांदेड पोलिसांची मोठी कारवाई! १२ सराईत गुन्हेगारांना केले तीन जिल्ह्यांतून हद्दपार
आगामी सण-उत्सवांच्या काळात सामान्य नागरिक, व्यापारी आणि महिलांमध्ये सुरक्षिततेचे वातावरण राहावे, या उद्देशाने नांदेड पोलिसांनी ‘२+ स्कीम’ अंतर्गत सराईत गुन्हेगारांची स्वतंत्र यादी तयार केली होती. नांदेड शहरातील शिवाजीनगर, वजिराबाद, भाग्यनगर तसेच नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यांच्या अभिलेखावरील गंभीर गुन्ह्यांत सातत्याने सक्रिय असलेल्या गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारीचे प्रस्ताव तयार करण्यात आले. पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित गुन्हेगार टोळ्या बनवून रात्री-अपरात्री धारदार शस्त्रे व खंजीर घेऊन फिरत होते. एकट्या नागरिकांना, रस्त्याने जाणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच दुकानदारांना अडवून धमकावणे, खंडणी मागणे आणि मारहाण करणे अशा प्रकारांमध्ये ते सक्रिय होते. त्यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, लूट, घरात घुसून मारहाण, दंगल आणि भारतीय हत्यार कायद्यान्वये अनेक गंभीर गुन्हे दाखल असून, संबंधित प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत.
पाच जण परजिल्ह्यातून; सात जण नांदेडमधून
भाग्यनगर ठाण्याच्या अभिलेखावरील वैभव सूर्यतळे याचा समावेश आहे. शिवाजीनगर ठाण्याच्या अभिलेखावरील यश ऊर्फ पिल्लू जोंधळे, सुबोध गजभारे आणि प्रशिक केळकर यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. वजिराबाद ठाण्याच्या अभिलेखावरील श्रीनिवास ऊर्फ आदु जाधव, प्रेमज्योतसिंग ऊर्फ सोनू तोपजी आणि सुरज ऊर्फ सुरज्या हाटकर यांनाही हद्दपार करण्यात आले आहे. नांदेड ग्रामीण ठाण्याच्या अभिलेखावरील आकाश शितळे, शुभम सुनेवाड, रणज्योतसिंग ऊर्फ बच्चूसिंग बावरी, सय्यद सलमान ऊर्फ भुऱ्या सय्यद बाबुमियाँ आणि अविनाश सोम भारती यांच्यावरही हद्दपारीची कारवाई झाली आहे.