
वनपुरी जमीन घोटाळ्यात नवीन ट्विस्ट! बोगस दस्तसाठी महिलांचा वापर; गुन्ह्याच्या नवीन फंडाने पोलिसही चक्रावले
सासवड/संभाजी महामुनी : वनपुरी येथील शेतजमिनीच्या विक्रीतील बोगस दस्त प्रकरणाची व्याप्ती वाढत आहे. यामध्ये आरोपींची संख्याही वाढत असल्याने दररोज नवनवी माहिती समोर येत असल्याने तपास अधिकारीही चक्रावून गेले आहेत. आरोपींनी अतिशय थंड डोक्याने बनावट दस्त बनवला असून पैशांच्या व्यवहार करण्यासाठी महिलांचा वापर करण्यात आला असल्याचे दिसून आले आहे. महिलांना पैसे द्यायचे आणि त्यांनी बोगस नावाने बँकेत खाते उघडून पैसे जमा करून पुन्हा काढून घ्यायचे, अशा पद्धतीने व्यवहार केले असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
वनपुरी येथील शेतजमीन गट नंबर २५२ मधील ७५ गुंठे आणि गट नं.२५८ मधील १४ एकर ५० गुंठे क्षेत्र प्रीयाली राकेश परदेशी यांचे असताना त्यांच्या जागेवर बोगस महिला उभी करून आरोपींनी बनावट दस्त तयार केला. गट नंबर २५२ मधील ४० गुंठे क्षेत्र संजना लाल प्रसाद यांना ३५ गुंठे जमीन. आदित शिशिर हिरे (रा. मालेगाव, नाशिक) यांना दस्त नं. १७८८ /२०२५ प्रमाणे खरेदीखत बनविले तर मनोज दत्तात्रय लोंढे (रा. नवले वस्ती, बारलोणी ता.माढा, जि. सोलापुर) यांना गट नं.२५८ मधील १४. ५० आर क्षेत्र दस्त नं. १७८९ /२०२५ प्रमाणे खरेदी दिले.
आरोपींना ३ ऑक्टोंबरपर्यंत पोलिस कोठडी
आर्थिक गुन्हे शाखेकडून प्रकरणाचा अत्यंत कसून तपास करण्यात येत असून यामध्ये दररोज नवी माहिती मिळत आहे. दरम्यान अटक केलेल्या आरोपींना बुधवारी ३० सप्टेंबरला कोर्टात हजर केले असता त्यांना ३ ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर प्रीयाली राकेश परदेशी यांच्या नावाने दस्त लिहून देण्यासाठी उपस्थित असलेली अर्चना मिरकुटे या महिला आरोपीसह गणेश टिळेकर यांची पुणे येथील येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
दोन नवे आरोपी; व्यवहाराच्या बदल्यात ५० हजार
नारायणपूर येथील आनंद सर्जेराव बोरकर याचा या गुन्ह्यात नव्याने समावेश करण्यात आला असून सासवड येथील तृप्ती शिंदे या महिलेला अटक करण्यात आली आहे. तृप्ती शिंदे या महिलेने बँकेत जरीन डिसोजा नावाने बनावट खाते उघडले आणि त्या खात्यामधून ९ लाख रुपयांचा व्यवहार केला. त्या मोबदल्यात तिने ५० हजार रुपये घेतले असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
चौकशीचा ससेमिरा वाचविण्यासाठी एजंट झाला फिर्यादी
वनपुरी येथील जमीन खरेदी प्रकरणात फसवणूक झालेली महिला संजना लाल प्रसाद पोलीस आयुक्तांच्या पत्नी असून मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या मुलासह तीन जणांची एक कोटी ७९ लाखांची फसवणुक झाली आहे. यांनी जमीन खरेदी करताना त्यांचा विश्वासू एजंट विनोद प्रल्हाद सुद्रीक (वय ४५, रा. साईनगर, लेन नं. २०, महालक्ष्मी अपार्टमेंट, कोंढवा) याच्या विश्वासावर व्यवहार केला असून यामध्ये त्याला काही लाखांचा फायदाही झालेला आहे. त्यामुळे आरोपींमध्ये याचाही समावेश असायला पाहिजे होता. मात्र, जमीन खरेदी करणारे मोठे व्यक्त असून चौकशीच्या फेऱ्यात अडकून पडू नये म्हणूनच एजंटला फिर्यादी केल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे फिर्यादी एजंटला आरोपी केल्यास कोणत्या अधिकाऱ्यांनी कुठे कुठे जमिनी घेतल्या याची माहिती पुढे येण्यास मदत होणार आहे.