
रिक्षातील प्रवाशाला कोयत्याचा धाक दाखवून लुटले; 24 तासांत सराईत टोळी जेरबंद
पिंपरी : रिक्षातील प्रवाशाला कोयत्याचा धाक दाखवून लुटणाऱ्या एका सराईत टोळीचा दक्षिण म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. कोणतीही ठोस माहिती नसताना, केवळ सीसीटीव्ही फुटेजच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावत अवघ्या २४ तासांच्या आत दोन सराईत गुन्हेगारांसह एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी अमन उर्फ शाहबाज समीर शेख (वय २६) आणि शेखर बापू माने (वय २१) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर त्यांच्या एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेऊन बाल न्यायमंडळासमोर हजर करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अजय चिंतामन देसले पाटील (वय २९) हे २८ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १० च्या सुमारास निघोजे-तळवडे ब्रिज रोडवरून जात होते. यावेळी एका अज्ञात रिक्षाचालकाने आणि त्याच्या दोन साथीदारांनी संगनमत करून फिर्यादी अजय यांना अडवले. आरोपींनी त्यांना कोयत्याचा धाक दाखवून दमदाटी केली आणि त्यांच्या खिशातील ११,४७० रुपयांची रोकड जबरदस्तीने चोरून नेली. याप्रकरणी दक्षिण म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात बी.एन.एस. कलम ३०९(४), ३(५) आणि आर्म ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी आवळल्या आवळल्या मुसक्या
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ तपास पथके रवाना करण्यात आली. घटनास्थळावरील कोणताही सुगावा नसताना, तपास पथकाने परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे बारकाईने तांत्रिक विश्लेषण केले. याद्वारे गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या रिक्षाचा क्रमांक मिळवण्यात पोलिसांना यश आले. या क्रमांकावरून माग काढत पोलिसांनी २४ तासांच्या आत आरोपींना अटक केली.
अटक केलेले आरोपी सराईत गुन्हेगार
अटक करण्यात आलेला अमन उर्फ शाहबाज शेख हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, निगडी पोलीस ठाण्यातील एका गंभीर ‘मोक्का’ गुन्ह्यातून अवघ्या १५ दिवसांपूर्वीच तो जामिनावर तुरुंगातून बाहेर आला होता. त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यांमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत. तर शेखर माने या आरोपीवरही यापूर्वी जबरदस्तीने चोरी करणे आणि मारहाण करणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड, अप्पर पोलीस आयुक्त (प्रादेशिक) डॉ. बसवराज तेली, आणि पोलीस उप आयुक्त (परिमंडळ ४) श्वेता खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ आणि त्यांच्या तपास पथकाने केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शरद पिंजारी करत आहेत.