
स्वारगेट एसटी स्थानकात दागिने चोरणाऱ्या महिलांना ठोकल्या बेड्या; लाखो रुपयांचे दागिने जप्त
पुणे : राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात प्रवासी महिलांकडील दागिने चोरणाऱ्या महिलांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. दोन वेगवेगळ्या कारवाईत तीन महिलांना अटक केली असून, त्यांच्याकडून दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. तर ४ लाख ४० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
लिलाबाई भोलेनाथ खंदारे (वय ६५), चंदाबाई छबू लोंढे (वय ६८, दोघी मूळ रा. सलबतपूर, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर), अश्विनी अविनाश भोसले (वय २७, रा. गणगेवाडी माही जळगाव, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक यशवंत निकम, गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास भारमळ, प्रदीपसिंग सिसोदे, उपनिरीक्षक बाळू शिरसट, अश्रृबा मोराळे, नाना भांदुर्गे, सागर केकाण, प्रशांत टोणपे, सुजय पवार, हर्षल शिंदे, सागर काळे, हनुमंत दुधे, संग्राम केंद्रे, रमेश चव्हाण, सुवर्णा सांगोलकर, अनिता घायतडक यांनी ही कामगिरी केली.
स्वारगेट एसटी स्थानकात प्रवासी महिलेकडील दागिने चोरुन नेल्याची घटना नुकतीच घडली होती. या प्रकरणाचा तपास करण्यात येत होता. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले. पोलिस कर्मचारी सुजय पवार आमि सागर केकाण यांनी दागिने चोरणाऱ्या महिलांचा शोध सुरू केला. तपासात दागिने चोरणाऱ्या महिला अहिल्यानगरमधील सलबतपूरच्या रहिवासी असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने दोघींना सलबतपूरमधून ताब्यात घेतले. दोघींकडून एक लाख ४० हजार रुपयांचे एक तोळ्यांचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले.
एसटी स्थानकाच्या आवारात प्रवासी महिलेकडील दागिने चोरुन नेण्याची घटना नुकतीच घडली होती. त्याअनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला. सीसीटीव्ही चित्रीकरण तपासून पोलीस कर्मचारी सागर काळे, हर्षल शिंदे यांनी दागिने चोरणाऱ्या महिलेची माहिती मिळवली. अश्विनी भोसले हिने दागिने चोरीचा गुन्हा केल्याची माहिती मिळाल्यानंतर तिला पोलिसांच्या पथकाने कर्जत तालुक्यातील मूळगावातून ताब्यात घेतले. एसटी स्थानकात दागिने चोरी प्रकरणी ३ महिलांना अटक केली असून, त्यांच्याकडून दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यांच्याकडून ४ लाख ४० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.