
सासवडमध्ये पोलिसांची मोठी कारवाई, गावठी पिस्टलसह तरुण ताब्यात; तब्बल 7 लाख 35 हजारांचा मुद्देमाल जप्त
सासवड : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, दररोज वेगवेघ्या भागात गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांकडूनही प्रयत्न सुरु आहेत. अशातच आता सासवडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. चंदन टेकडी परिसरात संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या तरुणाच्या कारची झडती घेतली असता डॅशबोर्डखालील ड्रॉवरमध्ये गावठी पिस्टल आढळून आले आहे. सासवड पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने तरुणाला अटक केली आहे. त्याच्याकडून गावठी पिस्टल आणि कार असा एकूण 7 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
शुभम सतीश कामठे (वय 25, रा. शिवरी, ता. पुरंदर) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 16) चंदन टेकडीजवळील के. के. पेढा दुकानाच्या पाठीमागील परिसरात करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे प्रकटीकरण पथकाला चंदन टेकडी परिसरात एक तरुण संशयास्पदरीत्या आढळून आला. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने समाधानकारक माहिती न देता उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांनी त्याला त्याच्या कारसह सासवड पोलिस ठाण्यात आणले. त्यानंतर त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता कारमध्ये अवैध अग्निशस्त्र असल्याची माहिती मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले.
दोन पंचांच्या उपस्थितीत कारची झडती घेतली असता पुढील डॅशबोर्डखालील ड्रॉवरमध्ये एक गावठी पिस्टल आढळून आले. पोलिसांनी तत्काळ पिस्टल जप्त करून शुभम कामठे याला अटक केली. या प्रकरणी सासवड पोलिस ठाण्यात शस्त्र अधिनियमातील कलम 3 व 25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कामठे याच्याकडून 35 हजार रुपये किमतीचे स्टीलच्या लोखंडी बॉडीचे गावठी पिस्टल आणि 7 लाख रुपये किमतीची काळ्या रंगाची मारुती कंपनीची फ्रॉन्क्स कार असा एकूण 7 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल, बारामती विभागाचे अपर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, पुणे विभागाचे अपर पोलिस अधीक्षक शुभम कुमार, भोर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रसिंह गौर आणि सासवड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.