
Pune Crime: अवघ्या थुंकण्यावरून वाद टोकाला; मुंढव्यात लोखंडी हत्याराने दोघांवर हल्ला
मंगळवारी (१५ सप्टेंबर) रात्री साडेआठच्या सुमारास विशाल रणदिवे आणि सूरज कांबळे (वय २१, दोघेही रा. केशवनगर, मुंढवा) हे परिसरात होते. त्यावेळी विशाल आणि कृष्णा गायकवाड (वय १९) यांच्यात समोर थुंकल्याच्या कारणावरून बाचाबाची झाली. सुरुवातीला किरकोळ वाटणारा हा वाद पुढे वाढला.
हेही वाचा: Pune News: गणेशोत्सवात तुकाराम मुंढेंचा जलवा; व्यंगचित्रातून भेसळखोरांना थेट इशारा!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या वादाचा राग मनात धरून कृष्णा गायकवाड याने आपल्या साथीदारांना घटनास्थळी बोलावून घेतले. त्यानंतर काही जणांनी एकत्र येत विशाल आणि सूरज यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली.
मारहाणीनंतर टोळक्याने लोखंडी हत्याराच्या उलट्या बाजूने दोन्ही तरुणांना मारल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर त्यांच्या डाव्या पायाच्या मांडीवर लोखंडी हत्याराने वार केल्याचा आरोप आहे. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे दोन्ही तरुण जखमी झाले. या घटनेनंतर सूरज कांबळे यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी कृष्णा गायकवाड (वय १९), समक्ष जाधव (वय १९), आदित्य गायकवाड (वय २०), अथर्व जाधव (वय १९) आणि ओम गव्हाणे (वय १९, सर्व रा. मुंढवा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणातील एका अल्पवयीन साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पाच आरोपींना नोटीस बजावण्यात आली आहे. हल्ल्यामागील नेमका वाद, सर्व आरोपींची भूमिका आणि घटनेत वापरण्यात आलेल्या हत्याराबाबत मुंढवा पोलीस पुढील तपास करत आहेत. किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद काही वेळातच हिंसक हल्ल्यात बदलल्याने केशवनगर परिसरात या घटनेची चर्चा आहे.