
शिक्रापूर : पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथील पाझर तलावात अज्ञात तरुणाचा खून करून मृतदेह फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. घटनेच्या वेळी मृताची ओळख पटलेली नव्हती अन् कोणताही पुरावा उपलब्ध नव्हता; मात्र शिरूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अत्यंत कौशल्याने आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अवघ्या तीन दिवसांत या अंधाऱ्या खुनाचा छडा लावत तिघा आरोपींना जेरबंद केले आहे.
१७ जुलै रोजी पिंपळे जगताप येथील पाझर तलावात एका अज्ञात तरुणाचा मृतदेह तरंगताना आढळून आला होता. मृतदेहाची पाहणी केली असता, अज्ञात व्यक्तींनी त्याचा खून केल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी स्थानिक पोलीस पाटील वर्षा योगेश थिटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सुगावा असा लागला
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चक्रे वेगाने फिरू लागली. तपास सुरू असतानाच ‘एल अँड टी’ फाटा परिसरात काही नागरिक एका हरवलेल्या तरुणाचा शोध घेत फिरत असल्याचे पोलीस शिपाई लखन शिरसकर यांच्या निदर्शनास आले. शिरसकर यांनी तातडीने त्यांच्याकडे चौकशी केली असता, पाझर तलावात सापडलेला मृतदेह हा टूटूकुमार अजित यादव याचाच असल्याचे निष्पन्न झाले. मृताची ओळख पटताच पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित पूसकरकुमार यादव याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता खुनाची संपूर्ण कहाणी समोर आली. चौकशीदरम्यान आरोपी पूसकरकुमारने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने हा खून केल्याची कबुली दिली.
यामध्ये पूसकरकुमार अरुण यादव (वय २० वर्षे), सध्या रा. सणसवाडी, ता. शिरूर, जि. पुणे, मूळ रा. बुन्ना बीघा, ठाणे घोसी, जि. जेहनाबाद (बिहार), आयुषमान सुशील पांडे (वय २० वर्षे) सध्या रा. गार्डन सिटी, तळेगाव रोड, शिक्रापूर, ता. शिरूर, जि. पुणे, मूळ रा. रामपूर भगवानपूर, जि. सिवान (बिहार), सचिन मारुती हिंगेवार (वय २० वर्षे), सध्या रा. सणसवाडी, ता. शिरूर, जि. पुणे, मूळ रा. जुनी, ता. धर्माबाद, जि. नांदेड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीस पथकाची उल्लेखनिय कामगिरी
कोणताही प्रत्यक्ष पुरावा नसताना अत्यंत तातडीने आणि कौशल्याने या गुन्ह्याचा छडा लावल्याबद्दल तपास पथकाचे विशेष कौतुक होत आहे. या धडक कारवाईत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी भोसले, हनुमंतराव गिरी, पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, सोमनाथ कचरे, पोलीस हवालदार नितीन सुद्रिक, अमोल दांडगे, शिवाजी चितारे, रोहिदास पारखे, अमोल नलगे, नवनाथ नायकडे, मिलिंद देवरे, चंद्रकांत काळे, आपदा टीमच्या सदस्यांनी सहभाग घेतला. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी भोसले करत आहेत.