
अघोरी पूजेच्या आमिषाने भक्तांची आर्थिक लूट; भोंदू बाबा मनोहरच्या टोळीवर मोक्का कारवाई
पंढरपूर/करमाळा/शिवाजी हळणवर : अघोरी पूजा, भोंदूगिरी आणि खोट्या धार्मिक विधींचे आमिष दाखवून सर्वसामान्यांची आर्थिक लूट करणाऱ्या ‘मामा’च्या टोळीवर सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मोठा घाव घातला आहे. करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथील मनोहर ऊर्फ ‘मामा’ भोसले आणि त्याचा प्रमुख साथीदार दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रामदास झोळ यांच्यासह तब्बल २४ आरोपींचे संघटित गुन्हेगारीचे जाळे तपासात उघडकीस आले असून, या टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. भोंदूगिरीच्या नावाखाली उभारलेल्या आर्थिक साम्राज्यावर पोलिसांनी केलेली ही कारवाई परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे.
कुर्डवाडी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासात या टोळीच्या कारवायांचे धक्कादायक स्वरूप समोर आले आहे. खोट्या व अघोरी पूजेचे आमिष दाखवून भक्तांकडून देणगीच्या नावाखाली रोख रक्कम उकळणे, ऑनलाइन माध्यमातून पैसे स्वीकारणे आणि त्यानंतर या पैशांची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा वापरणे, अशी टोळीची कार्यपद्धती असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात प्रत्यक्ष पैसे स्वीकारणारे, पैसा वळविणारे तसेच त्याची विल्हेवाट लावण्यासाठी मदत करणारे असे एकूण २४ आरोपी निष्पन्न झाले आहेत.
या प्रकरणातील मुख्य आरोपी मनोहर ऊर्फ मामा भोसले आणि त्याचा साथीदार विशाल ऊर्फ नाथबाबा वाघमारे यांना २५ एप्रिल २०२६ रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर तपासाची व्याप्ती वाढवत पोलिसांनी टोळीच्या आर्थिक व्यवहारांचा माग काढला. तपासात मामा भोसलेच्या सांगण्यावरून नागरिकांकडून पैसे उकळले जात असल्याचे तसेच हे पैसे पुढे विविध माध्यमांतून वळविले जात असल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे आरोपी रामदास झोळ आणि माया झोळ यांच्या स्वामी चिंचोळी, ता. दौंड, जि. पुणे येथील दत्तकला शिक्षण संस्थेचा कथित आर्थिक व्यवहारांसाठी वापर झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या मदतीने फसवणुकीतून मिळालेली रोख रक्कम संस्थेत आणली जात होती. त्यानंतर ही रक्कम कायदेशीर असल्याचे भासवून पुन्हा मनोहर भोसलेकडे पोहोचवली जात असल्याचे तपासात समोर आले आहे.
भोंदूगिरीच्या आडून सुरू असलेल्या या संघटित कारवायांमुळे सोलापूर ग्रामीण, पुणे जिल्हा आणि परिसरातील नागरिकांमध्ये भीती व दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. मनोहर भोसले यापूर्वीही एका गुन्ह्यात अटक होऊन जामिनावर बाहेर आला होता. मात्र, त्यानंतर पुन्हा गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय झाल्याचे तपासात पुढे आले. गुन्ह्यातून मिळालेल्या आर्थिक फायद्यातून स्थावर मालमत्ता खरेदी केल्याची बाबही पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे.
टोळीचा संघटितपणा, आर्थिक व्यवहारांचे जाळे आणि नागरिकांमध्ये निर्माण झालेली दहशत लक्षात घेऊन सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी विशेष पोलिस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र रंजन कुमार शर्मा यांच्याकडे मोका कायद्यातील कलमांचा समावेश करण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर आरोपींविरुद्ध मोका कायद्यातील कलमांचा समावेश करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास करमाळा उपविभागाच्या सहाय्यक पोलिस अधीक्षक अंजना कृष्णा करीत आहेत. अंधश्रद्धा, अघोरी पूजा आणि भोंदूगिरीच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतली असून, अशा प्रकारे फसवणूक होत असल्यास नागरिकांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले आहे.
मोक्का का लावला?
संघटित पद्धतीने नागरिकांची आर्थिक फसवणूक, पैशांचे ऑनलाइन व रोख व्यवहार, फसवणुकीच्या रकमांची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आणि गुन्ह्यातून मिळालेल्या पैशातून मालमत्ता खरेदी केल्याचा तपासातील निष्कर्ष यामुळे या टोळीविरुद्ध मोका कायद्याचा वापर करण्यात आला आहे.