
पुण्यात गुन्हेगारांकडून पिस्तूलांचा साठा पकडला, चार पिस्तुले; सहा जिवंत काडतुसे जप्त
पुणे : पुणे शहरातील गुन्हेगारी पिस्तूलांच्या आधारावर दहशत माजवित असल्याचे दिसत असून, हा आधार मिळवत गुन्हेगार धुडगूस घालत असताना सहकारनगर परिसरात गुन्हे शाखेने मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. गुन्हेगारांना पिस्तूल घेऊन फिरताना पकडल्याने मोठा गुन्हा देखील टळल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्याकडून चार पिस्तूल आणि सहा काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई युनिट दोनच्या पथकाने केली आहे.
सुफियान बशीर शेख (वय २२), निलेश प्रभुलिंग कुंभार (वय २१), तुकाराम बाबासाहेब गवते (वय १९), ऋषभ ऊर्फ ऋषी शिवाजी भगत (वय २३) आणि अमित राजाराम पिलावरे (वय २५) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या अंगझडतीत चार पिस्तुले आणि सहा जिवंत काडतुसे आढळून आली. याप्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २८८/२०२६ अन्वये आर्म्स अॅक्ट कलम ३(२५), महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७(१)(३) सह १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस उपायुक्त गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल खिलारे, पोलिस निरीक्षक अविनाश माने यांच्यासह युनिट दोनच्या पथकातील पोलिस हवालदार कुंदन शिंदे, अंमलदार शिवानंद कायगुडे, उज्वल मोकाशी तसेच त्यांच्या पथकाने केली आहे.
पुणे शहरात गुन्हेगारांनी धुडघूस घातला आहे. नुकत्याच सलग गोलीबाराच्या दोन घटना घडल्या. त्यापुर्वी गंभीर गुन्ह्यात व गँगस्टर टोळक्यांकडून पिस्तूलांचा वापर होत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार शहरात विशेष मोहिम राबविली जात आहे. यादरम्यान, गुन्हे शाखा युनिट दोनकडून १३ ऑगस्ट रोजी गुन्हे प्रतिबंधक गस्त सुरू होती. यावेळी पोलिस अंमलदार शिवानंद कायगुडे आणि उज्ज्वल मोकाशी यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, वनशिव वस्ती सहकारनगर परिसरात काही इसम संशयास्पदरीत्या थांबले असून त्यांच्याकडे अग्निशस्त्र आहे. माहिती मिळताच युनिट दोनचे प्रभारी वरिष्ठ निरीक्षक राहुल खिलारे यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले. पोलिसांनी घटनास्थळी धडक देत संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे पिस्तूलांचा साठा मिळाला.
जप्त शस्त्रे कुठून आणली, त्यांचा वापर कोणत्या गुन्ह्यांसाठी होणार होता आणि या पाच जणांच्या मागे आणखी कोणाचे जाळे आहे, याचा तपास आता पोलिसांकडून केला जाणार आहे. एकाच कारवाईत एवढ्या मोठ्या प्रमाणात पिस्तूलांचा साठा हाती लागल्याने पोलिसांच्या कारवाईचे गांभीर्य वाढले आहे. त्यामुळे पुण्यात बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्यांचे जाळे नेमके किती खोलवर आहे, हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
हे सुद्धा वाचा : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग अनावर; तरुणाच्या डोक्यात दगड घातला अन्…