
हायवा टिपर चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; वडगाव निंबाळकर पोलिसांनी दोघांना पकडले
सोमेश्वनगर : राज्यासह देशभरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, दररोज चोरटे नागरिकांना लुटत आहेत. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुढाळे येथील पेट्रोल पंपावरून हायवा टिपर चोरणाऱ्या टोळीला वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या टीमने मोठ्या शिताफीने जेरबंद केले आहे. याबाबत बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिक्षक चैतन्य कदम यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली.
दिनांक २४ जुलैच्या मध्यरात्री ते पहाटेच्या दरम्यान मुढाळे येथील किसन माळशिकारे यांच्या पेट्रोल पंपांवरुन हायवा टिपर चोरीला गेल्याची घटना घडली. याबाबत नवनाथ शंकर जगताप (रा. मुरूम ता. बारामती ) यांनी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यांच्या फिर्यादीनंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन मोहिते यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाला पाचारण केले. सीसीटीव्ही फूटेज, तांत्रिक तपास तसेच गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सुमारे २५० किलोमीटर असलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील वाळूंज एमआयडीसीपर्यंत माग काढत हा टिपर चोरणाऱ्या राहुल किसन कराळे ( वय. ३१ रा. सिरेगाव ता. गंगाखेड जि. संभाजीनगर ) व आदित्य रमेश कराळे ( वय. २५ रा. सिसेगाव ता. गंगाखेड जि. संभाजीनगर ) यांना अटक करून त्यांच्याकडून हायवा टिपर हस्तगत करण्यात आला आहे.
ही कामगिरी पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन मोहिते, पोलिस हवालदार भगवान पाटील, महेश पन्हाळे, पोपट नाळे, अनिल खेडकर, हृदयनाथ देवकर, भाऊसाहेब मारकड, आबा जाधव, नरेंद्र यादव, धनंजय भोसले, विकास येटाळे यांनी केली आहे.
मैत्रीणीच्या घरात डल्ला मारणाऱ्या मित्राला ठोकल्या बेड्या
पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिक्षक असलेल्या मैत्रीणीला भेटण्यास आल्यानंतर २४ हजारांची रोकड, सोन्याचे दागिणे असा १४ लाख ६३ हजार रुपयांचा ऐवज चोरी करून फरार झालेल्या मित्राला कोंढवा पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलिसांनी त्याला गुजरात राज्यातील वडोदरा येथून अटक केली असून, मैत्रीण शेजारी डब्बा देण्यास गेल्यानंतर त्याने ही चोरी केली होती. यश कैलास भुलचंदानी (वय. 24, रा. मोहाडी, जि. म्हैसाणा, गुजरात) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून चोरी केलेले १४ लाख ३९ हजार रुपये किंमतीचे १६ तोळे सोन्याचे दागिणे जप्त करण्यात आले आहेत.