संग्रहित फोटो
पुणे : राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, राज्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शहरात पुन्हा गाडीतून रोकड चोरून नेणारे चोरटे ‘अॅक्टीव्ह’ झाल्याचे दिसत असून, पर्वती दर्शनमध्ये कारची काच फोडून ५ लाखांची रोकड चोरून नेली आहे. तर, मार्केटयार्ड परिसरात मोपेड दुचाकीच्या डिक्कीतून १ लाखांची रोकड लांबविली आहे. दोन्ही घटनात ६ लाखांची रोकड पळविण्यात आली आहे. त्यामुळेच पुन्हा हे चोरटे अॅक्टीव्ह झाल्याचे दिसत आहे. याप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात २६ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार मार्केटयार्ड परिसरात राहण्यास असून, ते व्यावसायिक आहेत. त्यांनी कामानिमित्त बँकेतून ५ लाखांची रोकड काढली होती. रोकड त्यांनी कारच्या बॉक्समध्ये ठेवली होती. नंतर ते पर्वती दर्शन येथील मित्र मंडळ चौकातील सभागृह येथे आले. त्यांनी याठिकाणी कार पार्क केली. जवळपास दीड तास याठिकाणी कार पार्क होती. यादरम्यान, अज्ञाताने त्यांच्या गाडीची काच फोडून बॉक्समध्ये ठेवलीली रोकड चोरून पोबारा केला. तक्रारदार सायंकाळी सहाच्या सुमारास परत आले असता त्यांना हा प्रकार लक्षात आला.
दुसऱ्या घटनेत सातारा रस्त्यावरील एका हॉटेलच्या बाहेर पार्क केलेल्या मोपेड दुचाकीच्या डिक्कीतून १ लाखांची रोकड चोरून नेण्यात आली आहे. याप्रकरणी मार्केटयार्ड पोलिसांत २९ वर्षीय तरुणाने तक्रार दिली आहे. तक्रारदार आंबेगाव परिसरात राहण्यास आहेत. कामानिमित्ताने ते सातारा रोड परिसरात आले होते. तेव्हा त्यांनी एका हॉटेलच्या समोर त्यांची मोपेड पार्क केली. डिक्कीत १ लाखाची रोकड ठेवली होती. चोरट्यांनी मोपेडची डिक्की उचकटून त्यातील रोकड पळविली. अधिक तपास पोलीस करत आहेत.