संग्रहित फोटो
पुणे : कोथरूडमध्ये ज्येष्ठ नागरिक भाड्याने गाडी बुक करण्याची प्रक्रिया करत असताना सायबर चोरट्यांनी २ लाख ९० हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तक्रारदाराच्या क्रेडिट कार्डची माहिती मिळवून संशयितांनी रक्कम स्वतःच्या खात्यात वळवल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी उत्तम गायकवाड (वय ६१, रा. त्रिमूर्ती गुजरात कॉलनी, कोथरूड) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून कोथरूड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, २१ जुलैला सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास तक्रारदारांना कृष्णा कार रेंटल ऑफिसमधून बोलत असल्याचे सांगत फोन आला. फोन करणाऱ्याने आर्थिक फायद्यासाठी दिलेल्या लिंकवर जाऊन क्रेडिट कार्डची माहिती भरण्यास सांगितली. तक्रारदारांनी लिंकवर क्लिक करून गाडी भाड्याने बुक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या प्रक्रियेदरम्यान त्यांच्या आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डवरून २ लाख ९० हजार रुपये ऑनलाइन ट्रान्सफर केले. ही रक्कम अनोळखी बँक खात्यांमध्ये वळवून फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी आलोक अग्रवाल आणि अज्ञात बँक खातेदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, ऑनलाइन व्यवहारांचा मागोवा घेऊन आरोपींचा शोध सुरू आहे.
भाड्याने घेतलेल्या कारचा अपहार
लोहगाव येथील आश्रय सोसायटीत राहणाऱ्या व्यक्तीची चार लाख रुपयांची कार भाड्याने घेऊन परत न करता फसवणूक केल्याची घटना घडली आहे. कार भाड्याने घेऊन परत न करता ती इतरत्र ठेवण्यात आली असून, विमानतळ पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी स्वप्नील महादेवराव गिन्हे (वय ३९, रा. आश्रय सोसायटी, लोहगाव) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून शेख जावेद शेख जाफर (रा. अंबाजोगाई, बीड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने झूम कार अॅपवरून तक्रारदार यांची कार बुक केली. आरोपीने तक्रारदार व कंपनीचा विश्वास संपादन करून कार ताब्यात घेतली. मात्र, कराराप्रमाणे कार परत न करता ती इतरत्र ठेवली. अधिक तपास पोलिस करत आहेत.
सोशल मीडियावरील ओळख महिलेला पडली महागात
सोशल मिडीयाच्या माध्यमातून ओळख झालेल्या तरुणाने सीबीआय अधिकारी असल्याची बनावट ओळख सांगत महिलेचा विश्वास संपादन करून तिची चार लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तरुणाने महिलेला लग्नाचे आमिषही दाखविले होते. वानवडीतील फातिमानगर येथील ४२ वर्षीय महिलेने याप्रकरणी तक्रार दिली आहे. त्यावरू वानवडी पोलिसांत शिरीष जयंतीलाल गोहेल उर्फ चिराग मित्तल (वय २७, रा. ससाणेनगर, हडपसर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १८ जुलै २०२४ ते २३ जुलै २०२५ या कालावधीत घडली आहे.