मामेभावाशी बोलल्याने विवाहितेला सासरच्या मंडळींकडून बेदम मारहाण; पतीने पत्नीला बेल्टने... (संग्रहित फोटो)
छत्रपती संभाजीनगर : मामेभावाशी बोलल्याच्या कारणावरुन विवाहितेला पती, सासू आणि सासऱ्याकडून मारहाण करण्यात आली. ही घटना गेल्या आठवड्यात नारेगाव परिसरातील राजेंद्रनगरात घडली. विवाहितेला मारहाण करणारा पती रोहीत ज्ञानेश्वर शिंदे (वय २३) याच्यासह सासू संगिता शिंदे (वय ४५) व सासरा ज्ञानेश्वर शिंदे (वय ५० सर्व रा. राजेंद्रनगर, नारेगाव) यांच्याविरोधात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणात 21 वर्षीय पीडित विवाहितेने फिर्याद दिली. त्यानुसार, २५ सप्टेंबर रोजी पीडितेला किरकोळ कारणावरून पतीसह सासू-सासऱ्यांनी शिवीगाळ करून मारहाण केली होती. त्यानंतर २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास तिचा मामेभाऊ भेटायला घरी आला होता. तो निघून गेल्यानंतर पती रोहित याने ‘तू भावाला माझ्याबद्दल काय सांगितलेस? माझी तक्रार करतेस का?’ असा जाब विचारला. या कारणावरून त्याने पीडितेला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तर संगीता शिंदे हिने बेल्ट घेऊन आली आणि पतीने त्या बेल्टने पीडितेला मारहाण केली.
हेदेखील वाचा : पुण्यातील बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश, 29 जणांना घेतले ताब्यात; तपासातून धक्कादायक माहिती समोर
तसेच सासूने लाथा-बुक्क्यांनी चेहऱ्यावर हल्ला केला, ज्यामुळे पीडितेचा ओठ फुटून रक्त आलं. यावेळी जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. आता या प्रकरणाचा पुढील तपास हवालदार मेने करत आहेत.
पुण्यात सासरच्या मंडळींना कंटाळून विवाहितेची आत्महत्या
पुण्यातील वैष्णवी हगवणे हिने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचं समोर आलं. आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील नवं नवीन खुलासे समोर येत आहे. या आत्महत्येप्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटकही करण्यात आली आहे.
नाशिकमध्येही विवाहितेचा छळ
नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकमधील उच्चभ्रू वस्ती असलेल्या गंगापूर येथे विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सासरच्या जाचाला कंटाळून महिलेने आत्महत्या केल्याचा आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात सासरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.