संग्रहित फोटो
वाशिम : वाशिम शहर हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. त्यामुळे येथे पोलिस यंत्रणा नेहमी सतर्क राहते. मात्र, पोलिस यंत्रणेलाच या चोरट्यांनी आवाहन दिले आहे. शहरात रविवारी (दि. 5) एकाच दिवशी दोन घरफोड्या करून चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केला आहे.
शहरातील लोनसुनेनगरपासून काही अंतरावर असलेल्या प्रा. अरुणराव सरनाईक हे पुणे येथे काही कामासाठी गेले होते. येथे कामाला असणाऱ्या मावशी काही कामासाठी घराच्या दरवाजाला कुलूप लावून बाहेर गेल्यावर घरी कोणी नसल्याचे पाहून दुरवाजाचे कुलूप तोडून अवघ्या अर्ध्यातासात घरातील आलमारीमधील रोख व सोन्याचे दागिने पळविले. रविवारी (दि. 5) सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास घडली. घटनेनंतर लागलीच पोलिसांनी घटनास्थळ गाठले.
चोरट्याचा मागोवा लागला नसल्याचे समजते. तोच पंचनामा होत नाही त्याच वेळात या चोरट्यांनी सिव्हिल लाइन पाटबंधारे वसाहत पोलिस कॉर्टरच्या मागे राहत असलेले सीताराम सखाराम वाशीमकर यांच्या घराकडे मोर्चा वळवला. त्याठिकाणी सुध्दा घरातील मंडळी शेगाव येथे गेले होते. त्याचे लहान बंधू घरी होते. मात्र, त्यांना सुध्दा शेतात काम असल्याने सकाळी 11.30 वाजता घराला कुलूप लावून गेल्यावर चोरट्यांनी त्याचवेळेत दरवाजाचे कुलूप व कडीकोडा थेट उपटुनच काढला आणि घरातील आलमारीमधील सोन्याचे दागिने व रोख पळविली. मात्र, वाशीमकर काका सायंकाळी 5 वाजता परत आल्यावर घराचा दरवाजा उघडा असल्याचे दिसले. त्यावरून कळले की चोरी झाली.
तेव्हा त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना कळविले त्यांनी पोलिसांना फोन लावला. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी करून चोरट्यांनी या घरातील 32 तोळे सोने, 5 लाख कॅश असा लाखोचा ऐवज लंपास केल्याचे समोर आले आहे. पुढील तपास पोलिस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनात वाशिम ठाण्याचे ठाणेदार ठाकूर यांचे पथक करत आहे.
चोरटे दिवसाच ठेवतात पाळत
चोरट्यांनी जे घर बंद राहते, अशा घरांना टार्गेट बनविले आहे. या दोन्ही चोऱ्यांमुळे लोनसुनेनगर ते गजानन महाराज चौक, व सिव्हिल लाइन पाटबंधारे वसाहत या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या चोरट्यांनी दिवसाच घराचे कुलूप तोडून घरातील ऐवज लंपास केला. यावरून चोरटे किती शातीर आहेत, हे दिसून येत आहे. या चोरट्यांना वेळीच मुसक्या आवळाव्या, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.