फ्लॅटच्या नावाखाली एक-दोन नव्हेतर तब्बल 93 लाखांची फसवणूक; ऑनलाईन पैसे पाठवायला सांगायचा अन्...
नाशिक : फ्लॅट घेण्याच्या नावाखाली इंदिरानगर परिसरात ऑटो कन्सल्टंटसह इतर चौघांची 93 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी कमोदनगरातील इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता याप्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.
याबाबत विजय पाटणी (वय ५२, रा. गंजमाळ) यांनी फिर्याद दिली. या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांना इंदिरानगर परिसरात घर घ्यायचे होते. त्यांची मानलेली बहीण कमोदनगर परिसरात राहत असल्याने तेथे त्यांचे नियमित येणे जाणे होते. त्यावेळी त्याच परिसरात राहणारी ऐश्वर्या गायकवाड (रा. कमोद कॉलनी) हिच्याशी त्यांची ओळख झाली. २०२२ मध्ये त्यांनी संशयित आरोपी ऐश्वर्या गायकवाडला घर घेण्याबाबत सांगितले होते. तिने तिचे नातेवाईक असलेला दीपक देवळे (रा. कमोदनगर) याच्याशी ओळख करून दिली. पैशाची अडचण सांगत दीपकने पाटणी यांना कमोदनगर येथील फ्लॅट विकायचा असल्याचे सांगितले.
पाटणी यांना घर घ्यायचे असल्याने त्यांनी देवळेचा फ्लॅट पाहिला असता त्यांना तो पसंत पडला. त्या बदल्यात ४९ लाख ९० हजार रुपयांमध्ये हा फ्लॅट घेण्याचे ठरले. फ्लॅट घेण्यासाठी पाटणी यांनी विविध बँकांमधून कर्ज घेऊन त्याच्या टीजेएसबी बँकेच्या खात्यात वेळोवेळी ऑनलाईन ट्रान्सफर केले. पाटणी यांनी ऐश्वर्या गायकवाडकडे दीपक देवळेला देण्यासाठी ९ लाख ७४ हजार रुपये रोख स्वरूपात दिले. हे पैसे मिळाल्याचे देवळे याने पाटणी यांना कळविले होते.
हेदेखील वाचा : Fraud News : सायबर चोरट्यांकडून तिघांची फसवणूक; तब्बल 33 लाखांना घातला गंडा
नंतर देवळेने पाटणी यांच्या क्रेडिट कार्डावरून ७ लाख ६८ हजार रुपये वापरले. २१ ऑक्टोबर २०२३ रोजी पाटणी यांनी त्यांच्या मित्राच्या बँक खात्यातून पुन्हा देवळेला १ लाख २० हजार रुपये ऑनलाईन ट्रान्स्फर केले. असे एकूण २८ लाख २० हजार रुपये ऑनलाईन व रोख स्वरूपात देवळेने स्वीकारलेले होते. बरेच न दिवस होऊनही देवळेने पैसे परत न केल्याने व पाटणी यांनी वारंवार त्याच्याकडे पैशांची म मागणी केली. त्यावेळी दीपक देवळेने पुन्हा उडवा उडवीची उत्तरे देणे सुरू केले.
या दरम्यानच्या काळात पाटणी यांना समजले की, ऐश्वर्या गायकवाड हिने रोहिणी खैरनार, रेखा मोहिते, पद्मिनी वारे व भूषण वारे यांच्याकडून ४७ लाख १३ हजार ७४ रुपये व धरमवीरसिंग किर यांच्याकडून २ लाख ५० हजार रुपये असे एकूण ६४ लाख ४३ हजार ७४ रुपयांची फसवणूक करून त्यांचा अपहार केल्याचे समजले. अशा प्रकारे या बंटी-बबलीने एकूण ९२ लाख ६३ हजार ७४ रुपयांचा अपहार करून या पाचही जणांची फसवणूक केल्याचे पुढे आले. या प्रकरणी दोघां विरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून तपास सुरु आहे.






